www.24taas.com, मुंबई
राज्यातल्या दोन हजार सहाशे शाळा बंद होणार आहेत. ज्या शाळांमध्ये पन्नास टक्क्यांहून जास्त अनुपस्थिती आढळलीय. त्या शाळांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात ऍडमिशन घेताना काळजी घेणं आवश्यक झालंय.
राज्यात झालेल्या पटपडताळणी मोहिमेनंतर 50 टक्क्यांपेक्षा जास्त अनुपस्थिती असलेल्या शाळांवर कारवाई करण्यात येणार आहे. राज्यातल्या एकूण 2659 शाळांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त अनुपस्थिती आढळून आली. त्यामुळे या सर्व शाळांची मान्यता 31 मे पूर्वी काढून घेण्यात येणार आहे.
शासनाच्या आदेशानुसार मुंबईतल्या 29, पुण्यातल्या 35, नाशिकमधल्या 9, औरंगाबादमधल्या 15, नागपूरमधल्या 95 शाळांची मान्यता रद्द होणार आहे. धुळे जिल्ह्यातल्या सर्वाधिक म्हणजे 128 शाळा बंद होणार आहेत. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही शाळा बोगस आढळली नव्हती. बोगस शाळांमधल्या शिक्षकांनाही निलंबित करण्यात येणार आहे. सध्या या शाळातल्या विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. पण बोगस शाळांमध्ये प्रवेश न घेण्याची काळजी पालकांना घ्यावी लागणार आहे.