पुण्यातला इंधन चोरीचा काळा धंदा

ऑईल माफिय़ांचा आता पुण्याला विळखा पडलाय आणि त्यामधूनच दिवसाढवळ्या सुरू आहे. इंधन चोरीचा काळा धंदा. पुण्यातल्या ऑईल माफियांचा पर्दाफाश झी २४ तासने केला आहे.

Updated: Dec 16, 2011, 09:58 AM IST

ऑईल माफियांच्या मुजोरीनं आजपर्यंत अनेक जळीत कांडं घडली, अनेक बळी गेले. पण राज्यातल्या व्यवस्थेनं त्यापासून कुठलेही धडे घेतले नाहीत. याच ऑईल माफिय़ांचा आता पुण्याला विळखा पडलाय आणि त्यामधूनच दिवसाढवळ्या सुरू आहे. इंधन चोरीचा काळा धंदा. पुण्यातल्या ऑईल माफियांचा पर्दाफाश झी २४ तासने केला आहे.

 

पुण्यातला हा शेवाळेवाडी जकातनाका. या जकात नाक्याच्या मागच्या बाजूला भारत पेट्रोलियमचा हा टॅकर थांबलाय तो पेट्रोल भेसळ आणि पेट्रोलची चोरी करण्यासाठी. शेवाळेवाडी जकात नाक्यापासून सात किलोमीटरवर लोणी काळभोरमध्ये प्रमुख पेट्रोल कंपन्यांचे डेपो आहेत. तिथूनच हे टॅंकर्स भरून येतात. आणि जकात नाक्याच्या मागच्या बाजूला या टँकरमधून इंधन बेकायदेशीरपणे काढलं जातं. कॅनमधून ते इतर टॅकर्स किंवा वाहनांमध्ये भरलं जातं.

 

धक्कादायक बाब म्हणजे पेट्रोलची चोरी करुन त्याची इथेच विक्रीही केली जातेय. कॅनमधून पेट्रोल काढून थेट वाहनांमध्ये भरण्यासाठीही आधीच मांडवली झालेली असते. एक टँकर गेला की दुसरा टँकर. अशा पद्धतीनं पेट्रोल चोरीसाठी टँकर्सच्या रांगाच लागलेल्या असतात. बिनदिक्कत आणि राजरोसपणे हा काळा धंदा सुरू आहे.

 

साधारणपणे शंभर त दीडशे लीटर पेट्रोल प्रत्येक टँकरमधून काढलं जातं. या ऑईल माफियांवर आधीही कारवाई झाली होती, पण सगळं मुसळ केरातच गेलंय. पेट्रोल चोरी करुन झाली की हेच टॅँकर्स पुणे, पिंपरी-चिंचवड आणि इतर भागात रवाना होतात.

 

दररोज शेकडो लीटर इंधनाची चोरी याठिकाणी होते. सहाजिकच पेट्रोल पंपांना पेट्रोल मिळताना त्यामध्ये रॉकेल, पाणी आणि इतर रसायनं घालून भेसळ केलेली असते, हे उघड आहे. पुढे हेच भेसळयुक्त पेट्रोल पुणेकरांच्या वाहनांमध्ये भरलं जातं.

 

या भेसळयुक्त पेट्रोलमुळे वाहनं बिघडण्याचं प्रमाण वाढतं. त्याशिवाय इंधनचोरीच्या ठिकाणी सुरक्षेचे उपाय नसल्यानं कुठल्याही क्षणी आगीचा भडका उडू शकतो. जकात नाक्यावरच आग लागल्यानं मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

एवढे धोके असतानाही या काळ्या धंद्याबद्दल ना प्रशासनाला खेद, ना खंत ना चीड. जकात नाक्याजवळच दिवसाढवळ्या रोज शेकडो लीटर इंधनाची होणारी चोरी आतापर्यंत कुणाला दिसलीच नाही यावर विश्वास ठेवणं शक्य नाही. त्यामुळे या काळ्या धंद्याला अनेकांचे आशीर्वाद असल्याची चर्चा आहे.

 

[jwplayer mediaid="14456"]