राज ठरणार का 'किंगमेकर' ?

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सर्वांच्या चर्चेचा विषय आहे तो राज ठाकरेंच्या मनसेचा. उमेदवारीसाठी परीक्षा, त्यानंतर मुलाखती आणि सर्वात आधी उमेदवारी यादी जाहीर करून राज यांनी बाजी मारली, पण नाराजांनी दोन दिवस केलेल्या उद्रेकानं मनसेसाठीही आव्हान सोपं नसल्याचं समोर आलं.

Updated: Feb 3, 2012, 09:03 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिलंय, ते  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेचा मराठी मुद्दा केव्हाच हायजॅक केलाय. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचा झेंडा उतरवल्यानंतर आता मराठी मुद्यावरुन महापालिकेवर स्वतःचा झेंडा फडकवतात का याकडे साऱ्याचं लक्ष लागलंय.

 

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सर्वांच्या चर्चेचा विषय आहे तो राज ठाकरेंच्या मनसेचा.  उमेदवारीसाठी परीक्षा, त्यानंतर मुलाखती आणि सर्वात आधी उमेदवारी यादी जाहीर करून राज यांनी बाजी मारली, पण नाराजांनी दोन दिवस केलेल्या उद्रेकानं मनसेसाठीही आव्हान सोपं नसल्याचं समोर आलं. राज ठाकरे आता प्रचाराचा धुरळा उडवून देतील तेव्हा शिवसेनेसह विरोधकांना टार्गेट करतीलच, पण मराठीचं नाणंही खणखणीतपणे वाजवण्याचा प्रयत्न करतील. खरं तर मनसेची मुंबईतली ही काही पहिली निवडणूक नाही. पाच वर्षांपूर्वी मनसेनं जवळपास सर्व जागा लढवल्या, पण त्यांना दोन आकडी पल्लाही गाठता आला नाही. पाच वर्षांपूर्वीच्या त्या निवडणुकीनंतर मनसे संपली असं भाकितही काहींनी केलं. पण पाच वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. मराठी पाट्यांच्या मुद्यावर आक्रमक होत राज ठाकरेंनी वातावरण ढवळून काढलं. लोकसभेच्या निवडणुकीत त्याचा फटका शिवसेनेला बसला आणि विधानसभा निवडणुकीत मुंबईत मनसेचे सहा आमदार निवडून आले. त्यामुळे महापालिका निवडणुकीत मनसेकडे सर्वांचं लक्ष आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला दणका देणारी मनसे आता महापालिकेत किती मजल मारणार याची उत्सुकता आहे. मनसे किंगमेकरच्या भूमिकेत असेल अशी चर्चा असली तरी राज ठाकरेंचा दावा मात्र त्यापुढेच आहे...

 

मनसेच्या उमेदवार यादीत अपेक्षेप्रमाणं मराठी टक्क्याचं वर्चस्व आहे. परीक्षा आणि मुलाखतीनंतर उमेदवार जाहीर झाले असले तरी मतांचं गणितही विचारात घेण्यात आलंय. काँग्रेससारख्या पक्षात मराठी कार्यकर्त्यांवर अन्याय होतो असा आरोप झाल्यानं त्याचा फायदाही राज ठाकरे उठवतीलच.

 

अर्थात केवळ मराठीच्या मुद्यावर महापालिका निवडणूक जिंकता येणं शक्य नाही. मनसेकडून असलेल्या अपेक्षा त्यांचे कार्यकर्ते आणि नगरसेवक पूर्ण करतायत का याची पडताळणीही जनता करेल. आणि केवळ २७ टक्के मराठी मतांवर महापालिका जिंकणं शक्य होईल का याचं उत्तरही निवडणुकीत मिळेल. शिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांचं आव्हान मोडून एकहाती सत्ता मिळवण्याचं राज ठाकरेंचं स्वप्न या निवडणुकीत पूर्ण होतं का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.