www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
वयाच्या चाळीशीतच आज अनेक तरुणांना विविध व्याधी जडतात. घरच्या जबाबदा-या आणि नोकरी सांभाळत महिला तर तिशीपस्तीशीतच पन्नाशीच्या दिसतात. त्यातच घरचा कर्ता करविता नसेल तर कुटुंबाची परवड होते. मात्र नाशिकमध्ये ८२ वर्षांच्या सीताबाईंना बघितलं तर आजच्या तरुण तरुणींना लाज वाटेल असा त्यांचा उत्साह नवसावित्रींना लाजवतोय.
नाशिकच्या पंचवटी परिसरातल्या साळीवाडयातल्या या सीताबाई मोरे. हातावरच्या आणि चेह-यावरच्या सुरुकुत्या त्याचं वय सांगून जातात. मात्र ८० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या या सीताबाईंचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा आहे. सीताबाई मोरे नाशिक शहरात एक हॉटेल चालवतात. सीताबाईंची मिसळ या नावानं त्या नाशिकच्या भद्रकाली आणि पंचवटी परिसरात प्रसिध्द आहेत.
स्वातंत्र्यापूर्वी लग्न झाल्याझाल्या पतीला आजारपणानं ग्रासलं. नंतर नव-याला लकवा झाल्यानं घरातली 3 मुलं आणि एका मुलगी सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्या शिरावर आली. दूध डेअरी सांभाळत त्यांनी सीताबाईची मिसळ हा ब्रँड तयार केला. पहाटे पाचला उठून अकरापर्यंत हॉटेल. नंतर घर आणि पुन्हा संध्यकाळी व्यवसाय असा दिनक्रम त्या गेल्या पन्नास वर्षांपासून सांभाळतायत.
सीताबाईंच्या मिसळीची चव चाखण्यासाठी दूरवरून लोक येतात. त्यांच्याकडे मिळणारी शेवही तितकीच प्रसिध्द आहे. आजही कुठला कामगार हाताशी न घेता त्या या वयात स्वतःच गरम शेव काढण्याचं काम करतात. जबाबदारीचं भान आजही त्यांचे हात थरथरु देत नाहीत. त्यांचा एक मुलगा महापालिकेत नोकरी करतो दुसरा नाशिक करन्सी प्रेसमध्ये कामाला आहे. तर सीताबाईंना पीएसआय जावई लाभलाय. नातू पणतू झाले तरी तितक्याच हिरीरीनं त्यांचं काम आजही अव्याहपणे सुरुच आहे.
कितीही संकटं आली तरी अपार कष्ट आणि जिद्दीनं त्यांच्यावर यशस्वीपणे मात करता येते हे सीताबाईंनी आपल्या मेहनतीनं दाखवून दिलंय. आणि म्हणूनच २१व्या शतकातल्या महिलांसाठी त्या मेहनतीच्या आयकॉन ठरल्यायत.
पाहा व्हि़डिओ
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.