अमित देशपांडे www.24taas.com, वर्धा
दुष्काळात सगळीकडे ओरड होत असली तरी मात्र वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील शेतकरी सुखावलाय. इथल्या पूर्ती साखर कारखान्याच्या अभियंत्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी विधायक कामाचा दाखल देत अवघ्या तालुक्यातील शेतक-यांना पाण्याचा विवंचनेतून मुक्त केलंय.
वर्धा जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यात डोंगरातून येणा-या पावसाच्या पाण्याला कालव्याच्या माध्यमातून अडवण्याची कामगिरी यशस्वी झालीय. ही कौतुकास्पद कामगिरी पूर्ती उद्योग समुहाच्या कर्मचारी आणि अधिका-यांनी यशस्वी करुन दाखवलीय. या प्रयोगामुळे शेतक-यांना कपाशी,सोयाबीन आणि उसासाठी 12 महिने पाणी मिळणार आहे.
सध्या जिथे कालवा आहे तिथे पूर्वी नाला होता त्यामुळे पाऊस आल्यानंतर नाल्याला पूर येत होता. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरुन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत होतं. त्यामुळे हा नाल्याचं कालव्यात रुपांतर करुन त्यावर बंधारा बांधण्यात आल्याने शेतकऱ्यांचं मोठा फायदा झालाय.
या कालव्याला 40 लाख रुपये इतका खर्च आला असून शेतकऱ्यांना यापासून भविष्यात कोट्यावधींचं उत्पन्न मिळणार आहे. विधायक कामांसाठी जास्त खर्च येतोच असं नाही मात्र तशी दृष्टी आणि इच्छा असावी लागते दुर्दैवाने राज्यात असा होतांना दिसत नाही आणि आलेले पॅकेज खिशात कोंबले जातात आणि शेतकऱ्यांना आत्महत्यासाठी प्रवृत्त केलं जातं. ‘पूर्ती उद्योग समुहा’चा उपक्रम राज्यात हाती घेतला आणि आलेल्या पॅकेजसाचा सदुपयोग झाला तर खऱ्या अर्थाने शासन विधायक काम करत असल्याची जाणीव होईल.