इन्कम टॅक्स रिटर्न कसा भराल...

६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या करदात्यांसाठी सध्याच्या वर्षाला मिळकतीची सीमा दोन लाखांपर्यंत आहे. म्हणजेच, तुमचं वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 22, 2013, 08:10 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या करदात्यांसाठी सध्याच्या वर्षाला मिळकतीची सीमा दोन लाखांपर्यंत आहे. म्हणजेच, तुमचं वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे. ६० ते ८० वयाच्या व्यक्तींसाठी २.५ लाख आणि ८० पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना ५ लाखांपर्यंतच्या मिळकतीवर कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. तुमची मिळकत या सीमारेषेपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ३१ जुलैच्या अगोदर टॅक्स भरावा लागणार आहे.
ई-रिटर्न
सरकारतर्फे तुम्हाला तुमचा इन्कम टॅक्स ऑनलाईनही भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय. यालाच ई-रिटर्न म्हणतात. जर तुमचं उत्पन्न पाच लाखांपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला ई-रिटर्नच करावं लागेल.
इन्कम टॅक्स दाखल करण्यासाठी सीएची गरज?
तुमचा इन्कम टॅक्स तुम्हीदेखील भरू शकता... सीएच्या मदतीशिवाय. यासाठी तुम्हाला केवळ डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यूइनकमटॅक्सरिटर्नइंडियाडॉटकॉम (www.incomtaxreturnindia.com) वर जाऊन यासंबंधी माहिती मिळू शकते. आयकर विभागाच्या टीआरपी स्कीमअंतर्गत तुम्ही तुमच्या भागातील टीआरपीलाही फोन करून घरी बोलावून घेऊ शकता. यासाठी त्यांची फी जास्तीत जास्त २५० रुपये ठेवण्यात आलीय. आयकर विभागाच्या हेल्पलाईनवर फोन करूनही तुम्ही याबद्दल माहिती घेऊ शकता.
इन्कम टॅक्स रिटर्न भरलाच नाही... तर?
सरकारनं जाहीर केलेल्या तारखेपर्यंत तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरला नाही तर आयकर विभागाकडून तुम्हाला नोटीस मिळू शकते. दिलेल्या तारखेनंतर तुम्हाला प्रति महिना एक टक्का व्याजासहीत रिटर्न भरावा लागेल.
टॅक्स फायलिंगसाठी काय-काय लागतं?
रिटर्न दाखल करण्यासाठी कोणत्याही दस्तावेजाला जोडण्याची गरज नाही. पण, तुम्हाला हे दस्तावेज तुमच्याजवळ बाळगावे लागतील. कारण, चौकशीच्या वेळी याची गरज भासेल. तुम्हाला गेल्या सहा वर्षांपर्यंतचे दस्तावेजांचे रेकॉर्डस् तुमच्याजवळ असतील तर उत्तमच.

ई-फायलिंग कुठून करावं
आयकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सरळ ई-फायलिंग करू शकता. याशिवाय वेबसाईटवर अनेक वेब-पोर्टल आहेत जे २००-४०० रुपयांपर्यंत फी आकारून ई-फायलिंगसाठी तुम्हाला मदत करतात. यासाठी जास्तीत जास्त अर्ध्या तासाचा वेळ लागेल.
नव्या वर्षाचं रिटर्न भरण्यासाठी कशाची गरज लागते
यावर्षी रिटर्न फाईल करण्याअगोदर एकदा खात्री करून घ्या की तुम्ही तुमच्या गुंतवणुकीची आणि मिळकतीची पूर्ण माहिती दिली आहे. मिळकतीवर कापण्यात आलेला टीडीएस आणि फॉर्म २६एएसमध्ये भरलेली माहिती सारखी आहे याची खात्री करून घ्या.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.