सिनेमा : नौटंकी साला
दिग्दर्शक : रोहन सिप्पी
कलाकार : आयुष्यमान खुराना, कुणाल राय कपूर, एवलिन शर्मा, पूजा साळवी
www.24taas.com, मुंबई
सिनेमा तीन तास खेचायचाय म्हणून त्यात विनाकारण दृश्यांची भर घालणं आणि प्रेक्षकांनी ती सहन करणं ही काही आता नवीन गोष्ट राहिली नाही. ‘नौटंकी साला’मध्येही काही वेगळी गोष्ट दिसत नाही. लीड रोलमध्ये नवख्या पण दमदार कलाकार असूनही रोहन सिप्पीचा हा सिनेमा फारसा कमाल दाखवू शकलेला नाही.
कथा नौटंकीबाजांची
या सिनेमात आयुष्यमान खुराना हा मुख्य भूमिकेत आहे. आर. पी. राम परमार (आयुष्यमान) थिएटरशी निगडीत आहे. आर.पी हा एका मध्यमवर्गीय घरातील मुलगा... त्यामुळे इतरांची दु:ख त्याला पाहवत नाहीत. त्यामुळे मित्रांच्या मदतीसाठी हा सर्वात पुढे. याच आर. पीची ओळख मंदाल लेनेशी (कुणाल राय कपूर) होते आणि सिनेमाची कथा पुढे सरकते. आर.पी आणि मंदाल यांची थोड्याच काळात घट्ट मैत्री होते. कधी कधी त्यात थोडे रुसवे-फुगवेही येतात. मंदालचा नंदिनीबरोबर (पूज साळवी) ब्रेकअप होतो. त्यातच एवलिन शर्माचीही एन्ट्री होते आणि कथा अनेक या नौटंकीबाजांसोबत पुढे सरकते.
वेगळ्या सादरीकरणाचा प्रयत्न
सिनेमाला एका वेगळ्या ढंगात समोर आणण्याचा प्रयत्न झालाय. परंतू आपल्याच तालात चालणारे काही सीन्स या प्रयोगांना फोल ठरवतात. रिअल लाईफला रामायणाच्या पानांमध्ये शोधणाऱ्या दिग्दर्शकानं नक्कीच एक नवीन गोष्ट प्रेक्षकांच्या समोर ठेवलीय. परंतू ती गोष्ट प्रेक्षकांना समजली तर दिग्दर्शक यशस्वी झाला असं म्हणावं लागेल. काही गोष्टींमध्ये सिनेमा प्रेक्षकांवर नक्कीच प्रभाव करतो पण एकूण बघितलं तर सिनेमाचा प्रत्येक भाग विखरलेला वाटतो.
कलाकारांचा अभिनय जमेची बाजू
अभिनयाच्या बाबतीत म्हणाल तर आयुष्यमान आपल्या भूमिकेत एकदम फिट बसलाय. दिल्लीच्या टिपिकल पंजाबी मुलाची भूमिका सादर करणं आयुष्यमानसाठी खूपच सोपी गोष्ट ठरली. समीक्षकांनीही आयुष्यमानच्या अभिनयाला दाद दिलीय. आपण प्रत्येक व्हेरिएशनसाठी आणि वेगवेगळ्या रंगांच्या-ढंगांच्या भूमिकेसाठी तयार असल्याचं आयुष्यमाननं दाखवून दिलंय. कुणाल राय कपूरनंही त्याची भूमिका चांगली वठवलीय. पूजा साळवी आणि एलवन शर्मा यांचा अभिनय ठिक-ठाक म्हणावा लागेल.
संगीताचा अनोखा अंदाज…
म्युझिकबद्दल म्हणाल तर, ऐंशी-नव्वदच्या दशकातील अनेक सुपरहिट गाण्यांच्या वेगळ्या तऱ्हेनं सादर करण्याची पद्धत लोकांच्या पसंतीस उतरलीय. पण, प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळवण्यात हा सिनेमा सपशेल फेल ठरलाय. बाकी कुठेच वेळ जात नसेल तर जाऊन सिनेमा पाहून येऊ शकता.