फिल्म रिव्ह्यू : ये जवानी है दिवानी

‘ये जवानी है दिवाणी’च्या निमित्तानं बऱ्याच कालावधीनंतर प्रेक्षकांना एक चांगला सिनेमा पाहता येणार आहे. चित्रपट निर्माता अयान मुखर्जीनं प्रेक्षकांना या सिनेमाच्या रुपात प्रेक्षकांना एक चांगलंच गिफ्ट दिलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 1, 2013, 03:28 PM IST


सिनेमा : ये जवानी है दिवानी
निर्माता : अयान मुखर्जी
कलाकार : रणबीर कपूर, दीपिका पदूकोन, आदित्य रॉय कपूर, कल्की कोचलिन, फारुख शेख, तन्वी आझमी, माधुरी दीक्षित

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
‘ये जवानी है दिवानी’च्या निमित्तानं बऱ्याच कालावधीनंतर प्रेक्षकांना एक चांगला सिनेमा पाहता येणार आहे. चित्रपट निर्माता अयान मुखर्जीनं प्रेक्षकांना या सिनेमाच्या रुपात प्रेक्षकांना एक चांगलंच गिफ्ट दिलंय.
सादरीकरणाची खास पद्धत
अयानच्या या सिनेमात काहीही नवीन नसलं तरी सिनेमाच्या कथानकाला ज्या पद्धतीनं सादर करण्यात आलंय त्याला ‘फनटॅस्टीक’च म्हणावं लागेल. हीच सादरीकरणाची पद्धत या सिनेमाची खासियत ठरते आणि प्रेक्षकांच्या कौतुकाला पात्र ठरते.
सिनेमाचं कथानक
अर्थातच, सिनेमा एका तरुणाच्या आणि तरुणीच्या प्रेमसंबंधावर आधारित आहे. कबीर उर्फ बनी (रणबीर कपूर) एक बेजाबदार मुलगा आहे. बऱ्याच तरुणांप्रमाणे त्याचाही विवाहपद्धतीवर विश्वास नाही. तो आपल्या वडिलांसोबत (फारुख शेख) आणि सावत्र आई (तन्वी आझमी) सोबत राहतोय. अवि (आदित्य रॉय कपूर) आणि अदिती (कल्की कोचलिन) बनीचे सर्वात जवळचे मित्र. इथंही झमेला आहेच... अदितीचं अविवर जीवापाड प्रेम आहे पण त्याच्यासमोर ते व्यक्त करणं मात्र तिला जमलेलं नाही.
धम्माल केमिस्ट्री
रिअल लाईफमध्ये रणबीर आणि दीपिकाच्या ब्रेकअपनंतर तब्बल चार वर्षांनी दोघं एकाच सिनेमात दिसणार आहेत. पण, दोघांच्याही सिनेमातील कामाला, मेहनतीला आणि केमिस्ट्रीला दाद द्यावी लागेल. पडद्यावरही रणबीर आणि दीपिकाची केमिस्ट्री सॉलिड आहे, हे दोघांनीही सिद्ध केलंय.
कथा पुढे सरकताना
सिनेमाची कथा पुढे सरकते जेव्हा तीघं मित्र मनाली जाण्याचा प्लान करतात. नैना (दीपिका पदूकोण) ही बनीच्याच शाळेत शिकणारी मुलगी... सध्या मेडिकलचा अभ्यास करतेय आणि अभ्यासातून वेळ काढून थोडा ब्रेक घ्यावा म्हणत तीही इथं सुट्टी एन्जॉय करण्यासाठी या तिघांना जॉईन करते. मनालीला जातानाच या प्रवासात नैना आणि बनीच्या तारा जुळायला लागतात. एक दिवस नैना बनीसमोर आपलं प्रेम व्यक्त करण्याच्या तयारीत असते आणि तेव्हाचं तिला माहित पडतं की बनीला शिकागो विश्व विद्यापीठात स्कॉलरशिप मिळालीय. बनीला मिळालेली संधी गमवायची अजिबातच इच्छा नाही. त्यामुळे तो शिकागोला निघूनही जातो.
... आणि तब्बल आठ वर्षानंतर आदितीच्या लग्नासाठी बनी भारतात परततो. इथं त्याची पुन्हा एकदा नैनाशी भेट होते. जुनं प्रेम पुन्हा एकदा उफाळून येतं पण, यावेळेस मात्र नैना स्वत:ला सावरते कारण बनीला तर संपूर्ण जग फिरायचंय. आणि नैनाला तर तिचं कुटुंब आणि क्लिनिक (आता ती डॉक्टर आहे) सोडायचं नाहीए. अयान या सिनेमात दोन भिन्न मत मांडणाऱ्या आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे जगणाऱ्या लोकांचे भिन्न विचार खूप सुंदर पद्धतीनं मांडण्यात यशस्वी झालाय.
टेक्निकल बाजू
काही जागा थोड्या बोअरिंग वाटल्या तरी सिनेमातील काही दृश्यं मात्र प्रेक्षकांच्या मनावर परिणाम करून जातात. मनालीचा सुंदर निसर्ग आणि वातावरण कॅमेऱ्यात उत्तमरित्या कैद करण्यात आलंय. सिनेमाचं संगीतही मनामध्ये घोळत राहतं. संवाद सुंदर आहेत. नव्या जमान्यातील तरुण मुलांचे विचार स्पष्ट करणाऱ्या संवादांना प्रेक्षकांकडूनही मोकळ्या टाळ्या मिळतात.
रणबीर आणि दीपिकाच्या अभिनयाला दाद नाही दिली तर काय... जसजसं दोघंही बॉलिवूडमध्ये स्थिरावत चाललेल दोन्ही कलाकारांचा अभिनय प्रत्येक वेळेस अधिक उठावदार होतोय. त्यात दोघांच्या केमिस्ट्रीमुळे सिनेमाला चार चाँदच लागलेत. माधुरी दीक्षित एका गाण्यापुरती दिसते पण ‘घाघरा’ या एका गाण्यातच ती भाव खावून जाते.

एकूण काय तर...
अहो, निश्चितच... आता काय सांगायला हवं का की हा सिनेमा तुम्ही नक्की बघू शकता आणि तुमचा विकेन्ड नव्या उत्साहानं घालवू शकता. उत्कृष्ट असाच हा चित्रपट म्हणावा लागेल. संगीतकार प्रीतमनं पुन्हा एकदा कानाला गोड वाटेल असंच संगीत दिलंय. ‘बलम पिचकारी’ आणि ‘बद्तमीज दिल’ ही दोन गाणी तर अगोदरच हीट झालीत. एकूण काय तर प्रेक्षकांसाठी हा सिनेमा म्हणजे उत्तम मनोरंजन ठरू शकेल.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २