www.24taas.com, सोलापूर
दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्यात एका शेतकऱ्यानं ठिबक सिंचनचा नवीन प्रयोग केलाय. विशेष म्हणजे सहाशे रिकाम्या बाटल्यांचा वापर करुन ही ठिबक यंत्रणा तयार केली गेलीय. या कल्पकतेमुळे ३६० निंबोणीची झाडं दुष्काळातही हिरवीगार राहिलीयेत.
कमी पावसाचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहोळ तालुक्यात शेतीला सिंचनासाठी पाणी जेमतेमच मिळतं. अशातच दुष्काळ पडलेला... त्यामुळं शेतीला आणि बागेला मुबलक पाणी आणणार तरी कुठून... ठिबक सिंचन परवडणारं नाही. अशावेळी पाटकूल तालुक्यातल्या नाना सलगरांनी आपल्या घरातली निंबोणीची बाग अनोख्या पद्धतीनं जगवली... रस्त्याच्या शेजारी लोकांनी टाकलेल्या रिकाम्या बाटल्यांचा वापर त्यांनी कल्पकतेनं करून त्यांनी घरगुती ठिबक सिंचन यंत्रणा तयार केली. सहाशे रिकाम्या बाटल्यांचा वापर करुन त्यांनी ठिबक यंत्रणा तयार केली.
नाना सलगर यांनी प्रत्येक रिकाम्या बाटलीच्या बुडाला एक लहानसं भोक पाडलं. लिंबोणीच्या झाडाभोवती एक एक फूट अंतरावर लहानसा खड्डा खणून या बाटल्या सहा इंच जमिनीत पुरल्या. या बाटल्यांमधून अतिशय कमी वेगानं पाणी झिरपतं. त्यामुळं लिंबोणीच्या झाडाभोवती कायम ओलावा राहतो. शिवाय झाडाची पाण्याची गरजही भागवली जाते. शिवाय बाटलीचा वरचा भाग निमुळता असल्यानं बाष्पीभवनही अतिशय कमी होतं. त्यामुळं सलगर यांची ही युक्ती अतिशय उपयुक्त ठरलीये. त्यामुळेच सलगर यांच्या शेतातली 360 निंबोणीची झाडं दुष्काळातही हिरवीगार राहिली.
सलगर यांच्या निंबोणीच्या बागेसाठी एका लहान टाकीतलं पाणीही पुरेसे होते. घरगुती ठिबक सिंचन योजना कमालीची यशस्वी झाल्यानं परिसरातल्या शेतकऱ्यांकडून त्यांचं कौतुक होतयं. शिवाय सलगर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचा आत्मविश्वासही यामुळं दुणावलाय.