पुण्यातील वाहतूक बेशिस्तीला बसणार चाप

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी. पुण्याच्या एखाद्या नो एन्ट्रीच्या गल्लीत गाडी घुसवलीत किंवा आजूबाजूला पोलीस नाही असं बघून नो पार्किंगमध्ये गाडी लावलीत, तर आता ते तुम्हाला चांगलंच महागात पडणार आहे. कारण गल्लीत दबा धरुन बसलेले वाहतूक पोलीस एकदम तुमच्यासमोर येतील आणि चलन फाडतील आणि हे सगळं होणार आहे पोलिसांच्या `ऑपरेशन अचानक` अंतर्गत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 19, 2013, 11:54 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी. पुण्याच्या एखाद्या नो एन्ट्रीच्या गल्लीत गाडी घुसवलीत किंवा आजूबाजूला पोलीस नाही असं बघून नो पार्किंगमध्ये गाडी लावलीत, तर आता ते तुम्हाला चांगलंच महागात पडणार आहे. कारण गल्लीत दबा धरुन बसलेले वाहतूक पोलीस एकदम तुमच्यासमोर येतील आणि चलन फाडतील आणि हे सगळं होणार आहे पोलिसांच्या `ऑपरेशन अचानक` अंतर्गत.
पुण्याचा ट्रॅफिकचा प्रश्न कसा सोडवायचा, हा ब्रह्मदेवासाठीही कठीण प्रश्न आहे. पुण्यात वन वे, नो एन्ट्री या सगळ्या कवी कल्पना आहेत. काही पुणेकर सिग्नल न पाळणं, नो पार्किंगमध्ये गाडी लावणं म्हणजे स्वातंत्र्याइतकाच जन्मसिद्ध हक्क समजतात. हे सगळं थांबवण्यासाठी पुणे वाहतूक पोलीस वेगवेगळ्या आयडियाही शोधतायत. आता त्याचसाठी वाहतूक पोलिसांनी `ऑपरेशन अचानक` हाती घेतलंय.
ऑपरेशन `अचानक`अंतर्गत नेहमीची ठिकाणं आणि चौक वगळता पुण्याच्या गल्ल्यागल्ल्यांमध्येही वाहतूक पोलीस सापळा रचणार आहेत. एखाद्या पुणेकरानं नो एन्ट्रीमध्ये गाडी घुसवली, किंवा नो पार्किंगमध्ये लावली की लगेच पोलीस येणार आणि दंड वसूल करणार.... याशिवाय एखादा लायसन्स नसलेला अल्पवयीन मुलगा सापडला की फोन करुन थेट त्याच्या पालकांनाच बोलावून घेतलं जातं. अवघ्या एका आठवड्यात २१०० पेक्षा जास्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलीय. त्यातून सुमारे ८ लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय.
आजघडीला पुण्यातल्या वाहनांची संख्या ३५ लाखांवर आहे. त्यात दिवसागणिक भरच पडतेय. अशा परिस्थितीत शहरातली वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवायची असेल, तर अशा मोहिमा राबवणं गरजेचंच आहे. पण ५० लाखांच्या शहरासाठी ११०० वाहतूक पोलीस काय करणार ही गोष्टही ध्यानात घ्यावी लागेल.