www.24taas.com, सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातील केडगावच्या ‘कुष्ठधाम’ या सरकारी भिक्षेकरी गृहातील छळछावणीचा ‘झी 24 तास’नं पर्दाफाश केला होता. यानंतर एका दिवसात कुष्ठधामचा कायापालट करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. जिल्हा प्रशासनानं या बातमीची गंभीर दखल घेतलीय.
‘झी 24 तास’नं कुष्ठधाम या भिक्षेकरी गृहात स्टींग ऑपरेशन केलं होतं. या स्टींग ऑपरेशनमधून भिकाऱ्यांची - सरकारी व्यवस्थेतील दुरावस्था चव्हाट्यावर आणली होती. या भिकाऱ्यांच्या अंगावर साधे कपडेही नव्हते. दोन वेळचं जेवणही त्यांना मिळत नव्हतं. ‘झी 24 तास’नं या प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनानं याची तातडीनं दखल घेतली. मणरणासन्न अवस्थेततल्या दोन भिकाऱ्यांना करमाळ्याच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आलंय. तातडीने नवीन कपडे आणि दोन वेळेचं ताज जेवण उपलब्ध करून देण्यात आलंय.
गेल्या पाच वर्षात इथं १५० जणांचा बळी गेलाय, हे धक्कादायक वास्तव ‘झी 24 तास’ने समोर आणल्यानंतर जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारीही ताताडीने दाखल झालेत तर जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांनी कुष्ठधामला भेट दिली. अध्यक्षांनी भेट दिली तेव्हा तिथले कर्मचारी कागदपत्राची जुळवाजुळव करताना दिसत होते. जिल्हा परिषद अध्यक्षांनी कुष्ठधामच्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यानंतर सुरू नसलेला दवाखानाही एका दिवसात सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न सुरू झालाय. लाखो रूपये सरकारी बाबुंच्या खाबुगिरीत जात असल्याने उपासमार सहन करणाऱ्या भिक्षेकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्वंयपाकाच्या भट्ट्या पेटल्याने आनंद दाटून आलाय. ‘झी 24 तास’ने या भिक्षेकऱ्यांच्या हाल-अपेष्टा समोर आणून त्यांचं पुण्य वाटून घेतल्याची प्रतिक्रिया डॉ. निशिगंधा माळी यांनी दिली आहे.
.