www.24taas.com,पुणे
पुण्यातल्या गणेश मंडळांसाठी आनंदाची बातमी. यंदा गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये रात्री बारानंतरही पारंपारिक वाद्य वाजवता येणार आहेत. त्याचबरोबर गणेश मंडळांवर नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांचंही गणेशोत्सवाआधी विसर्जन करण्यात येणार आहे. त्यामुळे गणेश मंडळांना यावर्षी डबल धमाका मिळालाय.
यावर्षी पुण्यातली विसर्जन मिरवणूक रात्रभर रंगणार आहे. पारंपारिक वाद्यांचा गजर रात्री बारानंतरही सुरु राहणार आहे. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी याचं स्वागत केलंय.
गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या मिरवणूकीत ध्वनी प्रदूषण आणि इतर कारणांसाठी पुणे पोलिसांनी गणेश मंडळांवर सुमारे ४० गुन्हे दखल केले होते. या सर्व गुन्ह्यांचे गणेशोत्सवापूर्वी विसर्जन करण्याचं आश्वासनही देण्यात आलंय. त्यामुळे गणेश मंडळांना आणखी आनंद झालाय.
पुण्यात २००६ नंतर पहिल्यांदाच रात्रभर विसर्जन मिरवणुकीचा आनंद घेता येणार आहे. गणेश मंडळांवरच्या गुन्ह्यांचं विसर्जन होत असल्यानं पोलीस आणि गणेश मंडळं यांच्यामधला वादही सांपणार आहे.