www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गिरगाव चौपाटीवर गणपती विसर्जनासाठी गेलेल्या भाविकांना मासे चावल्याने घबराट पसरलीय. जेलीफिश व स्टिंग रे माशांच्या या हल्ल्यानंतर, विसर्जनाच्या वेळी काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत तर मुंबई महापालिकेने आता सावधगिरी बाळगल्याने घाबरण्याचे कारण नाही, असा विश्वास महापौर सुनील प्रभू यांनी व्यक्त केलाय.
मुंबईकरांवर सध्या नवे विघ्न कोसळलेय. दीड दिवसांच्या विघ्नहर्त्याला निरोप देण्यासाठी मंगळवारी गिरगाव चौपाटीवर गेलेल्या गणेशभक्तांवर माशांनी हल्ला चढवला. स्टिंग रे आणि जेलीफिश जातीच्या या माशांनी चावे घेतल्याने ५७ भाविक जखमी झाले. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरलीय. गणपती विसर्जनावेळी पाण्यात उतरलेल्या भाविकांना जेली फिशने दंश केल्याची माहिती राज्य सरकारने दिलीय. जेली फिश हा छत्रीच्या आकाराचा पारदर्शक जेलीसारखा प्राणी असून त्याच्या दंशातून तो विष टोचतो.
माशांच्या हल्ल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीने मुंबई महापालिका आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग आणि मत्स्य शास्त्रज्ञांशी चर्चा केली. विसर्जनाच्या वेळी काळजी घेण्याचे आदेश त्यांनी महापालिका व मत्स्य विभागाला दिलेत. तर या हल्ल्यानंतर आता मुंबई महापालिका अधिक सावध झालीय. मुंबईकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेतोय, असं महापौर सुनील प्रभू यांनी सांगितलं. मुंबईकरांवर गणेशोत्सवाच्या काळातच हे नवीन संकट ओढवलंय. त्यामुळे अशावेळी पाण्यात उतरण्याआधी मुंबईकरांनी स्वतः खबरदारी घेणंच योग्य ठरेल.
समुद्रकिनाऱ्यावर कसे आले स्टींग रे
हे जेलीफिश आणि स्टींग रे मासे अचानक गिरगाव चौपाटीवर कसे आले, याचे कुतूहल सर्वांना आहे. तर, हा स्टींग रे माशांचा प्रजननाचा काळ आहे. हा मासा अंडी न घालता पिल्लांना जन्म देतो. ही पिल्लं खोल पाण्यात जाता केवळे पाच ते सहा फुटांवर अन्न शोधतात. भरती कमी जाल्यास भक्ष्याच्या शोधार्थ ही पिल्लं समुद्रकिनारी येतात. ही पिल्लं साधारण दीड फूट बाय दीड फूट आकाराची असतात.
या स्टींग रे च्या नांगीत विषग्रंथी असतात. त्यालाच हिमोटॉक्सीन म्हणतात. नांगीचा प्रहार मोठा असल्यानं रक्तवाहिन्या तुटून मनुष्याच्या शरीरातील तांबड्या पेशी नष्ट होतात. त्यावर त्वरित औषधोपचार गरजेचा आहे अन्यथा व्यक्तीस आपला जीवही गमवावा लागतो, असं तज्ज्ञांचे म्हणणं आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.