www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या रिक्षा आणि लोकलमध्या प्रवासाचा गोंधळ चर्चगेट स्टेशनवर दाखल झाल्यानंतरही कायम होता. उत्साही कार्यकर्त्यांनी सुरक्षा यंत्रणेची तोडफोड केली. या तोडफोडीची चौकशी करण्यात येईल असं गृहमंत्री आर आर पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
चर्चगेट स्टेशनवर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा यंत्रणा धाब्यावर बसवली. केजरीवाल स्टेशनच्या बाहेर पडत असताना कार्यकर्त्यांमध्ये झुंबड उडाली. स्टेशनच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेले मेटल डिटेक्टर पायदळी तुडवले. त्यामुळं चर्चगेट स्टेशनवरील सुरक्षेचे तीनतेरा वाजले.
दरम्यान या तोडफोडीची चौकशी करण्यात येईल असं गृहमंत्री आर आर पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.. ही तोडफोड अनावधानाने झाली की जाणीवपूर्वक झाली याची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येईल असं गृहमंत्री आर आर पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
वाहतूक नियमांची ऐशीतैशी
अरविंद केजरीवाल यांनी मुंबईत आल्यानंतर वाहतूक नियमांची ऐशीतैशी करून टाकली. मुंबई विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते रिक्षातून अंधेरी स्टेशनकडे निघाले. मात्र या प्रवासामध्ये आपच्या कार्यकर्त्यांनी वाहतुकीचे नियम सर्रास धाब्यावर बसवले.
रिक्षाला लटकत कार्यकर्त्यांनी प्रवास केला. एकेका रिक्षामध्ये पाच-पाच कार्यकर्ते बसले होते... त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचीही पार वाट लागली. आता आपवर कारवाई करण्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे. वाहतुकीची शिस्त मोडणा-या राजकीय पक्षाच्या नेत्यांवर खरोखरच कारवाई होणार का, असा सवाल मुंबईकर करत आहेत.
आम आदमी पक्षाचे समन्वयक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवालांची मुंबईतली रिक्षातली सवारी आणि लोकलवारी चांगलीच चर्चेची ठरली. केजरीवाल सकाळी साडे दहाच्या सुमारास दिल्लीहून विमानानं आले. त्यानंतर त्यांनी थेट रिक्षातून अंधेरी स्टेशन गाठले. त्यांच्यासह त्यांचे कार्यकर्तेही रिक्षातूनच आले खरे मात्र यावेळी त्यांनी वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवल्यानं काही काळ वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. त्यानंतर केजरीवाल यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह लोकलमधून प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी चर्चगेट लोकल पकडली.
मात्र केजरीवाल यांना विंडो सीट मिळाल्यानं त्यांना लोकलच्या रोजच्या गर्दीतून प्रवासाचा अनुभव मात्र घेता आला नाही. मात्र त्यांच्या लोकलच्या प्रवासामुळं कार्यकर्त्यांची गर्दी झाली आणि मुंबईकर प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळं केजरीवालांची मुंबईतली सफर मुंबईकरांना सफर करून गेल्याचंच दिसलं.
केजरीवालांचा अमेरिकन फंडा
निवडणुकीसाठी फंड गोळा करण्यासाठी आपने डिनर विथ केजरीवाल हा नवा फंडा काढलाय. स्वतःला आम आदमीचे नेते म्हणवणा-या केजरीवालांसोबत डिनर करायचं असेल तर चक्क 10 हजार रूपये मोजावे लागणार आहेत. आणि विशेष म्हणजे नागपूरच्या तुली इंटरनॅशनल या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये ही खास मेजवानी होणार आहे.
अरविंद केजरीवाल 13 आणि 14 मार्चला विदर्भाच्या दौ-यावर येत आहेत. या दरम्यान केजरीवाल चंद्रपूर, नागपूर, या शहरांचा दौरा करणार आहेत. त्यावेळी नागपूरमध्ये होणा-या या शाही भोजनासाठी आतापर्यंत 60 जणांनी नोंदणी केलीय. तब्बल 150 लोकांना आमंत्रित करण्याचं आपचं लक्ष्य आहे.
अमेरिकेत निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीनं फंड गोळा करण्याची पद्धत सर्वश्रूत आहे. आता आम आदमी पार्टी फंड जमा करण्याचा हा अमेरिकन फंडा भारतातही आणू पाहत आहे का ? असा सवाल केला जातोय. आणि तब्बल 10 हजार रूपयात जेवण करणं कोणत्या आम आदमीला परवडणार आहे? हा सर्वात मोठा सवाल आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.