www.24taas.com, झी मीडिया, अहमदनगर
2014च्या लोकसभा निवडणुकीत मतदानात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीत 97 टक्के मतदान झालेलं गाव कोणतं तुम्हाला माहीत आहे का? हे आदर्श गाव महाराष्ट्रातच आहे. त्याच नाव आहे हिवरेबाजार.
ग्रामविकासाच्या क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करणा-या या गावानं मतदानातही आदर्श निर्माण केलाय..गेल्यावेळी 40-45 टक्के मतदान केलेल्या या मुंबईसह येत्या 24 तारखेला मतदानाला जाणा-या सगळ्या मतदारांनी या गावाचा आदर्श घ्यायला हवा.
हिवरेबाजारात 97 टक्के मतदान झालंय. मुंबईकरांनो हिवरेबाजारचा आदर्श ठेवा आणि मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडा ! 24 तारखेला मतदान आहे. मतदान करा, नक्कीच फरक पडतो.
आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी झालेली मतदान केंद्रावरील गर्दी पाहून आश्चर्य व्यक्त होते. हिवरेबाजार या अहमनगर जिल्ह्यातल्या छोट्या गावातील मतदानासाठी मोठ्यासंख्येने मतदार बाहेर पडलेत. सुमारे साडे आठशे मतदान असलेल्या यां गावातील महिला पुरुष तसेच अगदी वृध्द मतदारांनी गुरुवारी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या.
नवं मतदार तरुण तरुणींचा उत्साह तर बघण्यासारखा होता. विशेष म्हणजे दुपारी एक वाजेपर्यंतच गावात 80 टक्के विक्रमी मतदानाची नोंद झाली. संध्याकाळपर्यंत 82 टाक्के मतदारांनी आपला कौल यंत्रात टाकला. उरलेलं अठरा टक्के मतदान या गावातील निवडणूक कामासाठी गेलेले शिक्षक. कर्मचारी आणि सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचं आहे. पत्राद्वारे केलेले हे पंधरा टक्के मतदान असून एकूण मतदानाची नोंद ९७ टक्के इतकी झालीय.
या गावानं निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता तयार केलीय. यामध्ये कुठल्याही आमिषाला बळी न पडण्याचा संकल्प आहे. संपूर्ण विचार करून मतदान करण्याचं आवाहनही आहे. या मागे प्रेरणा आहे गावचे माजी सरपंच पोपटराव पवार यांचा. शहरी भागातील मतदारांसाठी हिवरेबाजारानं आदर्शच घालून दिलाय. मुंबई-ठाण्यासारख्या शहरी भागात तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.
2009 च्या निवडणुकीत शहरी भागात मतदारांनी अत्यल्प प्रतिसाद दिला होता. कल्याण मतदारसंघात तर अवघ्या 39.39 टक्के मतदानाची नोंद झाली होती. मुंबई-ठाण्यातली आकडेवारीही कमी होती... कल्याण मध्ये- 39.39 टक्के, ठाण्यात 41.05 टक्के, उत्तर मुंबईत ४२.६ टक्के, उत्तर पश्चिम मुंबईत ४४.०६ टक्के उत्तर-पूर्व मुंबईत ४२.४६ टक्के, उत्तर-मध्य मुंबईत ३९.५२ टक्के, दक्षिण-मध्य मुंबईत ३९.५ टक्के तर दक्षिण मुंबईत 40.37 टक्के मतदान झालं होतं.
यंदा मात्र शहरांतील मतदारांनी मतदानाच्या सुट्टीचा उपयोग मौजमजेसाठी करण्याऐवजी, हिवरेबाजारचा आदर्श ठेवण्याची गरज आहे. जगातील सर्वात मोठ्या असलेल्या लोकशाहीची संसद निवडन्यासाठी प्रत्येकाने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान करण्यची आवश्याकता आहे. राज्यात होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानात मुंबईसह सर्व राज्याने हिवरेबाजारचा आदर्श घेतल्यास देशाचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.