www.24taas.com, झी मीडिया, जालना
जालना लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षातल्या उमेदवारांना नाराजीचा सामना करावा लागतोय. त्यामुळे विरोधी पक्षांबरोबरच पक्षांतर्गत नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान दोन्ही पक्षातल्या उमेदवारांसमोर असणार आहे.
जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून रावसाहेब दानवे चौथ्यांदा तर काँग्रेसचे विलास औताडे हे पहिल्यांदा निवडणूक लढवतायत. पण पक्षांतर्गत नाराजीमुळे ही निवडणूक दोघांसाठीही अवघड मानली जातीय. यंदा जालनामधून उमेदवारी मिळावी यासाठी ज्येष्ठ भाजप नेते हरिभाऊ बागडे इच्छूक होते, मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्यानं बागडे नाराज आहेत. ही नाराजी दानवेंसाठी अडचणीची ठरण्याची शक्यतायं.
भाजप सारखीच काँग्रेसचीही अवस्था आहे. आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसनं बाहेरच्या जिल्ह्यातल्या उमेदवारालाच उमेदवारी दिली. त्यामुळे जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षांसह सगळीचं जिल्हा काँग्रेसमधली मंडळी औताडे यांना किती मदत करेल याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय.
रावसाहेब दानवे आणि विलास औताडे हे दोन्ही उमेदवार मराठा समाजाचे असल्यानं यंदा ही मतं विभागली जाणार आहेत.दलित आणि मुस्लिमांची 24 टक्के मतं असून ही मतं आपल्याकडं खेचण्यासाठी दोन्ही उमेदवारांनी प्रयत्न सुरु केलेत. यंदाच्या निवडणुकीत आपणच विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
भाजप आणि काँग्रेसमधल्या या थेट लढतीत पक्षांतर्गत नाराजी ही डोकेदुखी दोन्ही उमेदवारांना सतावतीय.या डोकेदुखीवर औषध शोधणा-या उमेदवाराचीच विजयाची शक्यता अधिक असणारंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.