www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीत पुन्हा सरकार स्थापनेसाठी आता नवीन घडामोडी घडतायेत. आम आदमी पक्षानं पुन्हा सरकार स्थापन करावी, यासाठी काँग्रेसनं आपला समर्थन प्रस्ताव ‘आप’ला दिल्याचं कळतंय. मात्र याबद्दल अजून अधिकृतरित्या काही स्पष्ट झालं नाही.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसनं आम आदमी पक्षाला पुन्हा समर्थन देण्याचा प्रस्ताव दिलाय. तसंच आम आदमी पक्षही या प्रस्तावाबाबत विचार करतेय. तर दुसरीकडे केजरीवालवर सरकार बनविण्यासाठी दबाव वाढतोय. आम आदमी पक्षाचे 20 आमदार दिल्लीत सरकार बनवण्याच्या समर्थनार्थ असल्याचं कळतंय.
नवी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी जनलोकपाल विधेयकावर काँग्रेसकडून समर्थन न मिळाल्यानं त्यांनी राजीनामा दिला होता. काँग्रेसचं हे पाऊल म्हणजे भाजपला दिल्लीत सत्ता स्थापनेपासून रोखण्यासाठी आहे, असंही बोललं जातंय.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील आपच्या खराब प्रदर्शनानंतर पक्षाचे काही आमदार भाजपला समर्थन देण्याचा विचार करत आहेत आणि भाजपला सत्ता स्थापनेचा त्यांनी सल्ला दिल्याचं सांगण्यात येतंय. आता केंद्रात तर भाजपचीच सत्ता आलीय. त्यामुळं नवी दिल्लीत भाजप काय निर्णय घेईल, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.