www.24taas.com, झी मीडिया, रायबरेली
गांधी परीवार आणि रायबरेली मतदारसंघाचं अतूट नातं आहे. नेहरु आणि गांधी परीवाराच्या सत्तेची साक्षीदार असलेली रायबरेलीवर एक रिपोर्ट पाहूया.
रायबरेली. तेच शहर ज्याची ओळख आज देशातल्या राजकारणातल्या सर्वात मोठ्या परीवाराशी जोडली गेलीये. तसं पाहिलं तर रायबरेलीची ओळख खूप जुनी आहे. स्वातंत्र्यानंतरही बदलत्या भारताशी हे शहर जोडलं गेलंय. १९५२ नंतर आजपर्यंत सत्तेतल्या दोन पिढ्यांना या शहरानं पाहिलंय. नेहरु-गांधी परीवाराच्या राजकारणाचा एक हिस्सा, साक्षिदार बनलंय रायबरेली. फिरोज गांधींपासून इंदीरा गांधींचा काळा पाहिलाय या नगरानं आणि आता सोनिया गांधी.
१९५२ मध्ये पहिल्यांदा नेहरु-गांधी परिवारानं रायबरेलीच्या दरवाजावर आपल्या राजकारणाची मोहोर उमटवली. फिरोज गांधी यांनी या शहराला आपली कर्मभूमी म्हणून निवडलं. मात्र देशाच्या राजकारणात रायबरेली प्रकाशझोतात आली जेव्हा १९६७ मध्ये इंदीरा गांधींनी पहिल्यांदा येथून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. १९५२ पासून आत्तापर्यंत १७ निवडणुकांमध्ये १४ वेळा नेहरु-गांधी परीवाराला रायबरेली जनतेनं पसंती देत विजयी केलंय. गेल्या ६२ वर्षांत अनेक चढ-उतार या शहरानं पाहिलेत.
रायबरेलीनं देशातील सर्वात शक्तीशाली प्रतिष्ठीत परीवाराला नेहमी साथ दिली. भरभरुन मतं दिली. मात्र जनतेची झोळी रिकामीच आहे. सोनिया गांधींनी काहीच केलं नाही, अशी प्रतिक्रिया येथील नागरिक देतात. गांधी परीवारानं रायबरेली जनतेला नेहमीच भावनांमध्ये गुंतवलंय. म्हणून काही जण सोनियांच्या विजयाची मनोकामना व्यक्त करतात. तर दुसरीकडे सोनिया जिंकली नाही तर आम्ही अनाथ होऊ, असंही काहीजण सांगतात.
मात्र रायबरीलाचा एक आवाज देशाच्या सिंहासनाला हालवण्याचा ताकद बाळगून आहे. आणीबाणीनंतर १९७७ च्या निवडणुकीत इंदीरा गांधीचा येथून पराभव झाला होता. मात्र आता जनतेला आपली म्हणणं मांडण्यासाठी खूप प्रतिक्षा करावी लागते. आता पुन्हा एकादा सोनिया गांधींनी २०१४ लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं रायबरेलीला साद घातलीये. मात्र यंदाची निवडणूक वेगळी आहे. वातावरण, मुद्दे वेगळे आहेत. दिग्गज रिंगणात आहेत. अशा स्थितीत देशाच्या सर्वात शक्तीशाली कुटुंबाच्या भविष्याचा फैसला करणा-या रायबरेली जनतेचं नशिब कधी बदलणार हाच खरा प्रश्न आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ