www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या उपस्थितीनं अनेकांनी टीका केलीय. तर दुसरीकडे श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांना शपथविधीला बोलावल्यानं तामिळनाडूत अनेक नेते खवळलेत. मोदींच्या उद्या होणाऱ्या शपथविधीवर जयललिता बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे. जयललिता स्वतः किंवा त्यांचे कुणीही प्रतिनिधी शपथविधीला येणार नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
श्रीलंकेत तामिळ नागरिकांवर अत्याचार होत आहेत. अशा वेळी, महिंद्रा राजपक्षे येत असलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं म्हणजे तामिळनाडूतील जनतेच्या भावनेशी खेळण्याचाच प्रकार आहे. म्हणूनच, आम्ही मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार नाही, असं जयललिता यांनी निवेदनात नमूद केलं आहे.
जयललिता जरी येणार नसल्या तरी मोदींच्या शपथविधीला येणाऱ्या पाहुण्यांच्या यादीत मात्र दोन हजारांची भर पडली आहे. मोदींच्या शपथविधीला निमंत्रितांची यादी आता पाच हजारांवर पोहचली आहे.
दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी हे अन्य कामांच्या व्यापामुळं नरेंद्र मोदींच्या शपथविधीला अनुपस्थित राहणार असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं सांगितलं आहे. मात्र, चंडी यांच्या दांडीमागंही राजकीय कारण असल्याचं बोललं जातंय.
असं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायम सिंह यादव, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव हे मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, भाजपचे सर्व बडे पदाधिकारी सुद्धा निमंत्रितांच्या यादीत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिनिधी म्हणून सुरेश सोनी उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.