www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
लोकसभा निवडणुकीत रंगतदान लढतीमध्ये कोकणचा समावेश आहे. याठिकाणी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राणेंविरोधात काम करण्याची भूमिका घेतली आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला उमेदवार दिलेला नाही. आपली मते कोणाच्या वाट्याला जाऊ नयेत म्हणून मनसे नकाधिकार म्हणजेच `नोटा` (यापैकी कोणीही नाही) याचा वापर करणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मतांचे विभाजन होणार नसल्याने काँग्रेसला याचा फटका बसू शकतो.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मनसेने उमेदवार दिलेला नाही. कोकणात मनसे कोणाला पाठिंबा देणार, अशी कुजबुज गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मनसे नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले होते. मात्र, या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनीच तसे आदेश दिल्याचे बोलले जात आहे.
राज यांच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्त्यांमधील संभ्रम आता दूर झाला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गात मनसेने नोटा वापरण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे कोकण विभागीय संघटक परशुराम उपरकर यांनी दिली.
मनसे आणि मनसेचे मतदार वेगळ्या पद्धतीने मतदानाचा हक्क बजावतील. राज ठाकरे यांचा आदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यात आला असून पक्षाचा आदेश डावलणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे उपरकर यांनी सांगितले. मनसे संघटना बांधणी मजबूत कऱण्यात आलेली नाही. त्यामुळे ही जागा न लढविण्याचे राज ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले होते. विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत पक्षबांधणी पूर्ण करून, गटाध्यक्ष नेमण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.