नरेंद्र मोदी कॅबिनेट : आज राष्ट्रपतींकडे यादी धाडण्याची शक्यता

भारताचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये सहभागी होणाऱ्या मंत्र्यांच्या नावाची यादी आज (रविवारी) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे पाठविली जाऊ शकते

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 25, 2014, 01:54 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारताचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये सहभागी होणाऱ्या मंत्र्यांच्या नावाची यादी आज (रविवारी) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे पाठविली जाऊ शकते. मोदी 26 मे रोजी आपल्या छोट्या कॅबिनेटसहीत गोपनीयतेची शपथ घेऊन पदभार स्वीकारतील. हा शपथ ग्रहण सोहळा राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणार आहे.
मोदींच्या कॅबिनेटमध्ये असणार २५ ते २९ मंत्री असण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमधली काही ना निश्चित झाली आहेत. अरुण जेटलींकडे अर्थ मंत्रालय दिलं जाणार आहे. तर राजनाथ सिंह यांच्याकडे गृहखातं दिलं जाणार आहे. महाराष्ट्रासाठी आनंदाची बाब म्हणजे नितीन गडकरी यांच्याकडे दळणवळण खातं दिलं जाणार आहे. या खात्यामध्ये रेल्वे, शिपिंग, विमान वाहतूक, परिवहन यांचा समावेश करण्यात येणार आहे तर कृषि मंत्रालय व्यंकय्या नायडू यांच्याकडे दिलं जाणार आहे.
विशेष ऊर्जा खात्यात कोळसा आणि वीज यांचा समावेश केला जाऊ शकतो. परराष्ट्र मंत्रालयाचा कार्यभार
मोदी स्वतःकडे ठेवणार असल्याचं समजतंय. पियूष गोयल यांच्याकडे वाणिज्य, रविशंकर प्रसाद यांच्याकडे कायदा, व्यंकय्या नायडू यांच्याकडे कृषी, स्मृती इराणी यांच्याकडे सूचना प्रसारण मंत्रालयाचा कारभार सोपविला जाण्याची शक्यता आहे. करिया मुंडा लोकसभा स्पीकर पदाची जबाबदारी स्वीकारू शकतील.
सध्या गुजरात भवनमध्ये मुक्काम असलेल्या मोदींनी आपल्या विश्वासू सहकाऱ्यांशी सोमवारी होणाऱ्या शपथ सोहळ्याच्या तैयारीविषयी चर्चा केली. मंत्रिमंडळावरून आजही चर्चा सुरू आहे. एनडीएमध्ये सहभागी असलेल्या इतर पक्षांनाही सरकारमध्ये समाविष्ट करण्याची भाजपची इच्छा आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली टीडीपी, रामविलास पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोकजनशक्ती पार्टी या पक्षांनी लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केलीय. त्यामुळे त्यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची आशा आहे. शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष प्रकाश सिंह बादल यांनी याअगोदरच आपला पक्ष सरकारमध्ये सहभागी होणार नाही, असं जाहीर केलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.