गडकरींना आयकर विभागाकडून क्लीन चीट!

भाजपाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांना आयकर विभागाकडून क्लिन चीट मिळाली आहे. गडकरींविरोधात कुठलंही प्रकरण प्रलंबित नसल्याचं आयकर विभागानं स्पष्ट केलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 12, 2014, 02:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भाजपाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांना आयकर विभागाकडून क्लिन चीट मिळाली आहे. गडकरींविरोधात कुठलंही प्रकरण प्रलंबित नसल्याचं आयकर विभागानं स्पष्ट केलंय.
दिल्लीतील एका माहिती अधिकाराच्या कार्यकर्त्यानं विचारलेल्या माहितीनुसार, आयटी विभागानं नितीन गडकरी यांच्याविरोधात कोणताही चौकशी किंवा तपास प्रलंबित नसल्याचं स्पष्ट केलयं. भाजपाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान आयकर विभागानं गडकरी यांच्या कार्यालयावर छापे मारले होते. त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माघार घेतं राजीनामा दिला होता. पण, आता मात्र गडकरी यांच्यावर कोणतंही प्रकरण प्रलंबित नसल्याचं खुद्द आयकर विभागानं स्पष्ट केलंय.
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही पूर्तीवर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं म्हटलं होतं आणि त्यानंतर आयकर विभागाकडून चौकशी सुरू झाली होती. ऑक्टोबर 2013 मध्ये मुंबईत १२ ठिकाणी `पूर्ती` कंपनीच्या कार्यालयांमध्ये आयकर विभागाकडून चौकशी केली गेली.
दरम्यान, भाजप अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर केलेल्या पहिल्याच भाषणात नितीन गडकरींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. पूर्ती ग्रूपवर छापा घालणाऱ्या आयकर विभागालाही त्यांनी त्यावेळी लक्ष्य केलं होतं. भाजप सत्तेवर आल्यानंतर तुम्हाला कोण वाचवणार? अशी खुली धमकीच त्यांनी आयकर विभागाला दिली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.