कोणतेही बटण दाबा, मत राष्ट्रवादीला

कोल्हापूरमधील कागल तालुक्यातील हसूर खुर्द येथील मतदान केंद्रांवर यंत्रात बिघाड झाल्याने गोंधळ निर्माण झाला. मतदाराने कोणतेही बटण दाबले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेल्या घड्याळ्यालाच मत पडत असल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर, गावकऱ्यांनी गोंधळ घातला.

Updated: Feb 7, 2012, 05:12 PM IST

www.24taas.com, कागल

 

 

कोल्हापूरमधील कागल तालुक्यातील  हसूर खुर्द  येथील मतदान केंद्रांवर यंत्रात बिघाड झाल्याने गोंधळ निर्माण झाला.  मतदाराने कोणतेही बटण दाबले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेल्या घड्याळ्यालाच मत पडत असल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर, गावकऱ्यांनी गोंधळ घातला.

 

 

गोंधळानंतर मतदान केंद्रावर राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ आले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याची सूचना केली.  वेळप्रसंगी बळाचा वापर करा, अशा सूचना केल्याने वातावरण गंभीर बनले. मात्र, हसन मुश्रीफ यांनी याचा इनकार केला. मी पोलीस महानिरीक्षक  नाही. मतदान केंद्रासमोर सुमारे पाचशे नागरिकांची गर्दी झाल्याने पोलीस बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी करत होतो. फेरमतदानाची मागणी विरोधक करत असले, तरी हा निर्णय सर्वस्वी निवडणूक यंत्रणेचा आहे, असे मुश्रीफ म्हणालेत.

 

 

जिल्हा परिषदेसाठी निवडणुकीसाठी  हसन मुश्रीफ यांचा मुलगा नाविद मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत. हसूर खुर्द येथील मतदान केंद्रावर यंत्रमध्ये कोणतेही बटण दाबले तरी, राष्ट्रवादीला मतदान होत असल्याचे एका गावकऱ्याच्या निदर्शनास आले. याची तक्रार नोंदवित गावकऱ्यांनी मतदानावर आक्षेप घेतला. त्यामुळे दुपारी एकच्या सुमारास मतदान थांबविण्यात आले. गोंधळानंतर तणाव निर्माण झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. अखेर  मतदान यंत्र बदलण्याचा निर्णय घेतला आणि मतदान पुन्हा सुरु करण्यात आले.

 

 

काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.  कोणतेही बटण दाबले तरी, घड्याळाला मतदान होत असेल, तर आम्ही निवडणूक आयोगाकडे फेरमतदान घेण्याची मागणी करणार असल्याचे म्हटले आहे.