www.24taas.com,ठाणे
मुंबईत शिवाजी पार्कवर सभेसाठी कोर्टाकडून परवानगी नाकारण्यात आल्यावर राज काय बोलतात याबाबत उत्सुकता आहे. दुसरीकडे खासदार आनंद परांजपेंच्या राष्ट्रवादीशी झालेल्या सलगीनंतर शनिवारी बाळासाहेब काय बोलतात याबाबतही तर्कवितर्क लढवण्यात येतायत. त्यामुळे या दोन्ही दिग्गज ठाकरेंच्या ठाण्यातल्या सेंट्रल मैदानातल्या सभेवर सा-यांच्या नजरा असणार आहेत.
ठाणेकरांचं लक्ष सध्या सेंट्रल मैदानाकडं लागलं आहे.. कारणही असंचं आहे.. दोन दिवसांत दोन ठाकरेंच्या जाहीर सभा याच मैदानात होणार आहेत.. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मनपा रणधुमाळीतली पहिली जाहीर सभा आज ठाण्याच्या सेंट्रल मैदानात होतेय.
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज काय बोलणार याची उत्सुकता आहे. शिवाजी पार्क मैदानावर सभेला नाकारण्यात आलेली परवानगी, मुंबई, ठाण्यात शिवसेना आणि आघाडीच्या प्रचारांचा जोर, या सगळ्यांत आज राज ठाकरेंच्या तोफेतून कोणते बॉम्ब बाहेर पडणार याची उत्सुकता सा-यांनाच आहे. तर मनपा निवडणुकीत मैदानात उतरलेल्या शिवसेनाप्रमुखांची पहिली जाहीर सभा ठाण्याच्या सेंट्रेल मैदानावर उद्या होणार आहे.
शिवसेनेला पहिला विजय मिळवून देणा-या ठाण्यावर शिवसेनाप्रमुखांचं विशेष प्रेम आहे.. या जिव्हाळ्यातूनच बाळासाहेबांची पहिली सभा ठाण्यात होतेय. मनसे, आघाडीनं ठाण्यात सत्ताधारी शिवसेनेसमोर मोठं आव्हान निर्माण केलय. यात शिवसेनाप्रमुखांच्या सभेकडं सगळ्यांचं लक्ष आहे. शिवसेनाप्रमुख ठाण्याच्या सभेत काय गर्जना करणार, याची उत्सुकता सा-यांनाच आहे. त्यामुळे ठाण्याचं सेंट्रल मैदान सध्या चर्चेचा विषय ठरतंय.
दरम्यान, ठाण्यातल्या सेंट्रल मैदानावर ज्या राजकीय पक्षाच्या सभेसाठी मोठी गर्दी होते, त्या पक्षाला बहुमत मिळते असा पायंडा आहे. त्यामुळे १४ तारखेपर्यंत हे मैदान सर्वच राजकीय पक्षांनी आरक्षित केलंय.