मनसेची जंग, सेना-राष्ट्रवादी करते बेरंग

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. मनसेला मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदान मिळू नये म्हणून दोन्ही पक्ष एकत्र असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केलं आहे. बोरिवलीत रोड शोच्या दरम्यान त्यांनी ही टीका केली.

Updated: Feb 5, 2012, 06:09 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. मनसेला मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदान मिळू नये म्हणून दोन्ही पक्ष एकत्र असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केलं आहे. बोरिवलीत रोड शोच्या दरम्यान त्यांनी ही टीका केली.

 

 

याआधी शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला परवानगी नाकारण्यात आली. पण कुठल्याही परिस्थितीत शिवाजी पार्कवरच्या रस्त्यावर सभा घेणारच, असं आव्हान राज यांनी दिले आहे. कितीही केसेस टाका, पण शिवाजी पार्कजवळ सभा होणारच, शिवाजी पार्कवर सभा घेऊ दिली नाही तर रस्त्यावर सभा घेऊ, लोकशाहीत कोणालाही कुठेही सभा घेण्याचा अधिकार असल्याचेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट करत बंडाचा पवित्रा घेतला आहे. मनसेला १३ फेब्रुवारीला शिवाजी पार्कवर मनसेला सभा घ्यायची होती. पण हा परिसर सायलेन्स झोन असल्यानं मुंबई हायकोर्टानं मनसेची याचिका फेटाळली.

 

महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी १३ फेब्रुवारी रोजी शिवाजीपार्क मैदान मिळावे, अशी याचिका मनसेने दाखल केली होती. येथे प्रचारसभेसाठी परवानगी देण्यास विलंब करत असल्यामुळे मनसेने मुंबई महापालिकेविरोधात कोर्टात दाद मागितली होती. सभेच्या परवानगीसाठी मनपाकडे तब्बल ३५ अर्ज केले. मात्र अद्याप परवानगी मिळालेली नाही, असे मनसेकडून सांगण्यात आले होते. मनसेच्या कृतीसंदर्भात प्रतिक्रिया मागितली असता,  मनपा प्रशासनाने नियमांना बांधिल असल्यामुळेच शिवाजी पार्कवरील सभेला परवानगी दिली नसल्याचे सांगितले होते .

 

निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांना शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी एका दिवसाची परवानगी देणार नसतील तर काय झक मारायला घ्यायच्या निवडणुका. बंद करून टाका या निवडणुका, अशी उद्विग्न प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज व्यक्त केली. शिवाजी पार्कवर सभा घेण्याची मनसेला परवानगी नाकारल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.

 

शिवाजी पार्कवर यापूर्वी शिवसेनेचा दसरा मेळावा होऊ शकतो, त्यावेळी राज्य सरकारमध्ये सहयोगी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने शिवसेनेला परवानगी देण्यास हायकोर्टात सांगितले होते. आता राज्य सरकार परवानगी देऊ नये, असे सांगत आहे. त्यामुळे हे अनाकलनीय आहे, की राज्य सरकार सांगते तसा निकाल हायकोर्टकडून दिला जातो. हायकोर्ट किंवा निवडणूक आयोग या संस्थांकडून पारदर्शक कारभार व्हावा, ही अपेक्षा असते, मात्र तो होत नाही, या बद्दल कोणी बोलूही नाही, का, ही काय मोगलाई आहे? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

 

हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी हा मुद्दा लक्षात घेऊन सभेला परवानगी द्यावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. न्यायदेवतेच  एक पारडं एका बाजूला झुकलेलं आहे, अशी टीप्पणी राज ठाकरे यांनी यावेळी केली.

 

हायकोर्टाने आम्हांला शिवाजी पार्कवर सभा घेण्याची परवानगी नाकारली, पण सभा कुठे घ्यायच्या हे सांगितले नाही. शिवाजी पार्कवर घेऊ नये, आझाद मैदानावर घेऊ नये, गिरगाव चौपाटीवर घेऊ नये, अशी बंधन लादतात. सांगतील एमएमआरडीए मैदानावर घ्या, अरे कुणी कुत्रं तरी येतं का या ठिकाणी असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

 

प्रत्येक ठिकाणी सायलेन्स झोन करायचं असेल, तर निवडणुका रद्द करा. जाहिरात करताना विरोधी पक्षावर टीका करून नका, अशा प्रकारे सर्वच बाजुंनी बांधुन ठेवायचे आणि निवडणुकांना सामोरे जा, अशी अडवणूक केली जाते, असे राज ठाकरे यांनी सांगितले. मला सभेला परवानगी नाकारली म्हणून हा प्रश्न उपस्थित केला नाही. पण लोकशाहीत कोणालाही कुठेही सभा घेण्याचा अधिकार आहे. आता जर शिवाजी पार्कमध्ये सभा घेऊ दिली नाही, तर आम्ही रस्त्यावर सभा घेऊ असा इशारा राज यांनी यावेळी दिला.

 

शांततेच्या मार्गाने निवडणुका व्हाव्यात असे आम्हांलाही वाटते, मात्र, अशी आडकाठी करून शांतता भंग होण्याची शक्यता असल्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला.