www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
उत्तरप्रदेशात शिवसेना भाजपच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला... नरेंद्र मोदी यांना उघड - उघड आव्हान देणार असल्याच्या वृत्तानं शिवसेना आणि भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली. त्यानंतर, काही वेळातच असलेल्या उद्धव ठाकरे यांचा मुलगा आणि युवासेनेचे 'टेक सॅव्ही' नेते आदित्य ठाकरे यांनी तातडीनं ट्विटवर या वृत्ताचा इन्कार केला.
अगोदर आलेल्या वृत्ताप्रमाणे, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एका न्यूज एजन्सीसमोर हे वक्तव्य केलं होतं. उत्तरप्रदेशात शिवसेना भाजपविरुद्ध लोकसभा निवडणूकीत आपले २० उमेदवार उभे करणार असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं होतं. या २० जागांमध्ये शिवसेना नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध वाराणसीमधून आणि राजनाथ सिंह यांच्याविरुद्ध लखनौमधून उमेदवार उभं करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
न्यूज एजन्सी 'एएनआय'शी बोलताना संजय राऊत यांनी हे विधान केलं होतंं. गुजरात, उत्तरप्रदेश, बिहार, दिल्ली, केरळ, बंगाल या राज्यांत शिवसेनाही आपले उमेदवार उभे करणार आहे. यामध्ये, बिहारमध्ये ७ जागांवर, दिल्लीत ५ जागांवर तर उत्तरप्रदेशात २० जागांवर शिवसेना भाजपविरुद्ध मैदानात उतरणार आहे. उमेदवारांना अधिकृत ए, बी फॉर्मचे वाटप सुरू झाले आहे.
मनसे आणि भाजपच्या छुप्या युतीला उत्तर देण्याचा शिवसेनेचा हा प्रयत्न असल्याच्या प्रतिक्रिया, या वृत्तानंतर लगेचच उमटल्या होत्या.
आदित्य ठाकरे यांचं ट्विट :
'आमच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराविरुद्ध शिवसेना कोणताही उमेद्वार उभा करणार नाही...' असं स्पष्टीकरण देत आपल्याला या गोष्टीचं हसू येत असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. अर्थातच, आपण वाराणसी आणि लखनौमध्येही उमेदवार उभा करणार नाही असं आदित्य ठाकरे म्हणत आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.