आयसीसी वर्ल्ड कप : भारत-पाकमध्ये रंगणार युद्ध

टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपची सलामी लढत रंगणार आहे ती एशियन जायंट्स असलेल्या भारत आणि पाकिस्तानमध्ये...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 21, 2014, 09:19 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपची सलामी लढत रंगणार आहे ती एशियन जायंट्स असलेल्या भारत आणि पाकिस्तानमध्ये...
ट्वेन्टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपची ओपनिंगचं या धमाकेदार मॅचनं होणार असल्यानं क्रिकेटप्रेमींसाठी हा मुकाबला एक पर्वणीच ठरणार आहे. दोन्ही टीम्स तुल्यबळ असल्यानं क्रिकेटप्रेमींना या वर्ल्ड कपच्या निमित्तानं सलामीलाच भारत आणि पाकिस्तानमधील सुपरहिट मुकाबल्याची ट्रीट क्रिकेटप्रेमींना मिळणार आहे
भारत आणि पाकिस्तान यांच्या मॅचमधील तोच थरार पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे तो टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपच्या निमित्तानं... भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानावरील कट्टर प्रतिस्पर्धी... केवळ जिंकणे हा एकमेव उद्देश या दोन्ही टीम्सचा असतो. कुठल्याही टीमबरोबर पराभूत झालं तरी चालेल मात्र पाकिस्तानकडून पराभव भारतीय पाठिराखे सहनच करू शकत नाहीत.
टीम इंडिया टी-२० वर्ल्ड कपमध्ये पाककडून कधीच पराभूत झालेली नाही. त्यामुळे भारतीय टीमचच पारडं या मॅचमध्ये जड असेल. मात्र, एशिया कपमध्ये पाकनं भारतावर मात केली होती. त्यामुळे याचाच फायदा काहीप्रमाणात पाकिस्तानच्या टीमला होईल. `वॉर्म अप` मॅचमध्ये भारतानं इंग्लिश टीमचा पराभव करत आपला फॉर्म परत मिळवला आहे.
टीम इंडियाची बॅटिंगची भिस्त ही विराट कोहलीवर असेल. सध्याच्या घडीला तो भारताचा नंबर वन बॅट्समन आहे. वॉर्म अप मॅचमध्येही याचीच प्रचिती आली आहे. शिखर धवन आणि रोहित शर्मा ही ओपनिंग जोडी अपयशी ठरतेय. त्यामुळे अजिंक्य रहाणेला ओपनिंगला येण्याची संधी आहे. सुरेश रैनालाही लय सापडलीय. त्याचप्रमाणे सिक्सर किंग युवराजही टीममध्ये परतल्यानं भारतीय बॅटिंग लाईनअपला अधिक मजबूती मिळणार आहे.
तर बॉलिंगमध्ये स्पिनर्सवर मोठी जबाबदारी असेल. आता रवींद्र जाडेजा, आर. अश्विन आणि अमित मिश्रा या तीन स्पिनर्सपैकी कोणला संधी मिळणार? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. मोहम्मद शमी या तेज बॉलरकडूनही मोठ्या अपेक्षा असणार आहेत. पाकिस्तानची टीमही समतोल टीम आहे. त्यामुळे भारताला कडवी टक्कर देण्यास त्यांची टीम आतूर असेल. शाहिद आफ्रिदीपासून टीम इंडियाला धोका आहे. त्याचप्रमाणे उमर गुलपासूनही भारताला सावध रहाव लागणार आहे. आता क्रिकेटच्या मैदानावरील या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील बिग फाईटमध्ये कोणती टीम बाजी मारते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.