पुण्यातील उमेदवाराचे भवितव्य नव्या मतदारांच्या हाती

नव्या दमाचे ७३ हजार मतदार ठरवणार आहेत, पुण्यातील उमेदवाराचे भवितव्य. पुणे लोकसभा मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहेत. या यादीमध्ये लोकसभेसाठी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या म्हणजेच १८ ते २२ वयोगटातील मतदारांची संख्या तब्बल ७३ हजार ३४२ इतकी आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 16, 2014, 09:37 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
नव्या दमाचे ७३ हजार मतदार ठरवणार आहेत, पुण्यातील उमेदवाराचे भवितव्य. पुणे लोकसभा मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहेत. या यादीमध्ये लोकसभेसाठी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या म्हणजेच १८ ते २२ वयोगटातील मतदारांची संख्या तब्बल ७३ हजार ३४२ इतकी आहे.
पुण्यामध्ये निवडून येण्यासाठी ७३ हजार ३४२ हा जादुई आकडा कुठल्याही उमेदवारासाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे. मतदार नोंदणीच्या अखेरच्या तारखेपर्यंत जी नोंदणी झाली त्यानुसार १८ ते २२ वयोगटातल्या मतदारांची एकूण संख्या ७३ हजार ३४२ आहे. यातले वयाची १८ वर्षं नुकतीच पूर्ण केलेले लोकसभेसाठी स्वाभाविकपणे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. मात्र जे २२ चे आहेत, तेदेखील लोकसभेसाठी पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.
पुण्यातल्या गेल्या ४ लोकसभा निवडणुकांमधले विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवार यांच्यातली फरकाची आकडेवारी अतिशय महत्त्वाची आहे. १९९६ मध्ये सुरेश कलमाडींनी भाजपच्या गिरीश बापटांचा ८१ हजार मतांनी पराभव केला होता. १९९९ मध्ये भाजपचे प्रदीप रावत ९१ हजार मतांनी निवडून आले होते. २००४ मध्ये कलमाडी पुन्हा ७३ हजार मतांनी निवडून आले. २००९ मध्ये कलमाडींनी पुन्हा एकदा भाजपच्या उमेदवाराचा अवघ्या २५ हजार मतांनी पराभव केला होता. यावरून यावेळी वाढलेले ७३ हजार मतदान ज्याच्याकडे झुकेल त्याची स्थिती मजबूत ठरणार आहे.

हा नवमतदार फिगर ऑफ डिफ्रन्स भरून काढणारा ठरू शकतो. कारण हा नवमतदार परिवर्तनाची भाषा बोलतो, देशातली हवाही जाणतो, आणि महत्वाचं म्हणजे हा नवमतदार यावेळी मतदान करायला कमालीचा उत्सुक आहे. त्यामुळेच निवडणुकीची परंपरागत समीकरणं गृहीत धरली तरी, या नवमतदाराचा कौल ज्याला, तोच पुण्यात विजयी होणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.