www.24taas.com, झी मीडिया, वाराणसी
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज वाराणसीत जात आहेत. मात्र, मोदी तिथून बारा किमी दूर असलेल्या जगतपूरमध्ये सभा घेणार आहेत.
सरकारनं वाराणसीच्या बेनियाबाग इथं रॅलीची परवानगी दिली पण उशीरा... असं कारण देत भाजपनं मोदींचे सर्व कार्यक्रम रद्द केलेत. गंगा आरती, हॉटेलमध्ये दीडशे व्यक्तींना भेटण्याचा कार्यक्रम भाजपनं रद्द केलाय. जगतपूरच्या रॅलीशिवाय मोदींचे इतर कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत. त्याऐवजी भाजप वाराणसी आणि दिल्लीत मोदींच्या रॅलीला परवानगी न देण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाविरोधात धरणं आंदोलन करतील.
ठरलेले कार्यक्रम रद्द करावे लागल्यानं नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून खेद व्यक्त करत आणि कार्यकर्त्यांना शांतता बाळगण्याचं आवाहन केलंय...
‘कार्यकर्त्यांनो शांतता बाळगा... निवडणूक आयोगाचा पक्षपातीपणा दुर्भाग्यपूर्ण आहे. गंगा माता कुठल्याही राजकारणापेक्षा मोठीच आहे. निवडणूक आयोगाच्या पक्षपाती धोरणामुळे भाजप कार्यकर्त्यांना सत्याग्रह करावा लागतोय. पण, आरती करू शकत नसल्यामुळे गंगा मातेची माफी मागतो’ असं म्हणत ‘कार्यकर्त्यांनो, शांतता बाळगा... लोकांना त्रास होईल, असं कृत्य करू नका...’ असं आवाहन मोदींनी आपल्या कार्यकर्त्यांना केलंय.
दरम्यान, उत्तरप्रदेशचे भाजप प्रभारी अमित शहा यांनी डीएमना हटवण्याची मागणी केलीय. डीएम कुणाच्या तरी इशाऱ्यावर काम करत असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली असून त्यांना हटवण्याची मागणी भाजपने केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.