शरद पवारांवर हल्ला झाला त्याचे चित्रिकरण जर पाहिले तर त्यांच्या सोबत एकही पोलिस अधिकारी नव्हता. मी अनेक वर्षे पवारसाहेबांबरोबर राहिल्यामुळे मला हे माहित आहे की ते कोणत्याही प्रकारची सुरक्ष व्यवस्था घेऊन फिरत नाहीत. पण त्यांच्या पक्षातले छोटे मासे आहेत ते गरज नसताना सुरक्षा रक्षकांच्या दोन दोन गाड्या सोबत घेऊन फिरतात वाय प्लस झेड प्लस सुरक्षा घेऊन फिरतात.
शरद पवार म्हणाले की माझे राजकीय वैर असू शकतं पण चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत माझे कुणाशीही वैयक्तिक वैर नाही. महाराष्ट्रात सर्वत्र या घटनेचा निषेध होतो. शिवसेनाप्रमुखांनीही पहिल्यांदाच बाहेर येऊन स्पष्ट शब्दात या हल्ल्याचा निषेध केला आहे. महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाचा अपमान होणारी घटना दिल्लीत घडली आहे. शरद पवार हे महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते आहे. महाराष्ट्राला जेंव्हा मदतीची गरज भासते तेंव्हा दिल्लीत राज्याच्या समस्या सोडवणारे पवार हे एकमेव नेते आहेत.
दिल्ली पोलिसांची सुरक्षा यंत्रणा काय करत होती हे मलाच कळत नाही. पवारांवर हल्ला करणाऱ्या तरुणाला खाजगी सुरक्षा रक्षकांनी पकडलं. पवारांसारख्या मोठ्या नेत्याबरोबर एकही काँस्टेबल किंवा पोलिस नसावा ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे, दिल्लीतील सरकारची शोकांतिका आहे. माजी दूरसंचार मंत्री सूखराम यांच्यावर चार दिवसांपूर्वी याच तरुणाने हल्ला केला होता त्यावेळेस व्यवस्थित चौकशी केली असती तर हे टळू शकलं असतं. आणि योग्य ती दक्षता बाळगली असती तर हा हल्ला झाला नसता. आता चौकशीचा फार्स करुन काय उपयोग? आपली सुरक्षा यंत्रणा किती सक्षम आहे हे या सरकारने दाखवून दिलं आहे. हा भ्याड हल्ला आहे आणि त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.
अण्णांनी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मला मनापासून वाईट वाटत आहे, की हे महाराष्ट्रात काय चाललं आहेत. अण्णांनी महात्मा गांधींपासून प्रेरणा घेऊन संपूर्ण देशात एक वेगळं वातावरण निर्माण केलं होतं. अण्णांच्या आंदोलनाच्या काळात दुसऱ्या कोणत्याही घटना चॅनेल्सनी दाखवली नाहीत. फक्त अण्णा एके अण्णा. प्रत्येक वेळेस अण्णा म्हणायचे की माझे आदर्श महात्मा गांधी आहेत. गांधींजी टोपी त्यांनी डोक्यावर चढवली. आजची तरुण पिढी ज्यांना गांधींजींचे विचार माहीत नाहीत ते मै अण्णा हूँची टोपी घालून रस्त्यावर फिरत होते. त्यांना अभिमान वाटत होता की मी अण्णांची टोपी घातली आहे.
गांधींजींनी अशा कोणत्याही हल्ल्याचे कधीही समर्थन केलेलं नव्हतं. गांधीजींचा आदर्श मानणारे अण्णा हल्ल्याचे समर्थन करतात. 'एक ही मारा' असं वाक्य अण्णांच्या तोंडातून कसं काय येतं. कधी कधी आम्हाला वाटतं की अण्णा तोंडातून एक बोलतात आणि मनामध्ये त्यांच्या काहीतरी वेगळं आहे की काय? अशी भावना सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात निर्माण झाली. खरोखरच अण्णांचा आदर आज सकाळ पर्यंत करत होतो पण दुपारनंतर अण्णांचा आदर करावा की करु नये असा प्रश्न माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पडलेला आहे.