अॅसिड हल्ला : पुण्याच्या 'त्या' तरुणाला अटक

सध्या तुरुंगात असलेला कथित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू आणि त्याचा पुत्र नारायण साई यांच्या विरोधात साक्ष देणाऱ्या व्यक्तींना काही अज्ञातांकडून लक्ष्य केलं जातंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 18, 2014, 04:18 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
सध्या तुरुंगात असलेला कथित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू आणि त्याचा पुत्र नारायण साई यांच्या विरोधात साक्ष देणाऱ्या व्यक्तींना काही अज्ञातांकडून लक्ष्य केलं जातंय. रविवारी, अशाच एका साक्षीदारावर हल्ला करणारा किशोर बोडके हा तरुण पुण्याचा रहिवासी असल्याचं आता उघड झालंय.
आसाराम पिता-पुत्रांवर गेल्या सोळा दिवसांत तीन वेळा हल्ले करण्यात आल्याचं समोर आलंय. रविवारीही सुरतमध्ये एका साक्षीदारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. आसारामबापू यांच्याविरुद्ध दिनेश भाऊचंदानी यांनी २००८ मध्ये अहमदाबाद पोलिसांकडे तक्रार दिली होती. तसेच, महिलांवरील अत्याचारप्रकरणी ते साक्षीदार आहेत. नारायणसाईंच्या विरोधातही साक्ष देण्यासाठी ते मदत करीत आहेत. त्याच भाऊचंदानी यांना लक्ष्य करण्यात आलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर अॅसिडहल्ला करण्यात आला.
किशोर बोडके, चंद्रशेखर पिल्लई, गोपाळ पाटीदार या तिघांनीच हा हल्ला केल्याचं उघड झालंय. पोलिसांनी या तिघांनाही अटक केलीय. यापैंकी किशोर बोडके हा मूळचा पुण्याचा असल्याचं समोर आल्यानं हल्ल्यामागचा मुख्य सूत्रधार कोण? तसेच बोडके हा पुण्याहून सुरतला कसा आला? याचा सुरत पोलीस तपास करीत आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.