नवी दिल्ली: सरकारी काम आणि सहा महिने थांब, याचा प्रत्यय आपल्याला अनेक वेळा आला असेल. असंच काहीस घडलं केरळच्या एका वृद्ध दाम्पत्याबरोबर. 90 आणि 83 वर्षांच्या असलेल्या या दाम्पत्याला आधार कार्ड बनवायचं होतं. या वृद्ध दाम्पत्याचा मुलगा राजा शिवराम यांनी गेल्या कित्येक महिन्यांपासून त्यांचं आधार कार्ड बनवण्याचा प्रयत्न करत होता. पण दोघंही वृद्ध असल्यामुळे त्यांना आधार सेंटरवर जाणं शक्य होत नव्हतं. याबाबत अधिकाऱ्यांना त्यांच्या मुलानं वारंवार विनवणी करुनही कोणताच फायदा झाला नाही.
अखेर शिवराम यांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहीलं आणि आपली व्यथा मांडली. त्यानंतर तीनच दिवसांमध्ये आधार कार्ड बनवणारी टीम वेबकॅम, फिंगरप्रिंट मशिन, कॉम्प्युटर आणि आयस्कॅनर घेऊन पोहोचली. आणि एका आठवड्यामध्ये आधार कार्डाची ऑनलाईन कॉपी देणार असल्याचं अधिकाऱ्यांनी शिवराम यांना सांगितलं. यामुळे शिवराम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.