www.24taas.com, झी मीडिया,नवी दिल्ली
पाकिस्तानी सैन्याच्या वेशात भारतीय हद्दीत घुसून अतिरेक्यांनीच जवानांवर हल्ला केला, असे धक्कादायक वक्तव्य संरक्षणमंत्री ए के अँन्टोनी यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अँन्टोनी यांच्या या विधानानंतर संसदेत नापाक हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटले. यासंदर्भात निवेदन करताना संरक्षणमंत्री अँन्टोनी यांनी केलेल्या वक्तव्याचा राज्यसभेचे विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी चांगलाच समाचार घेतला.
अँन्टोनी यांच्या वक्तव्यामुळं पाकिस्तानला बचावासाठी आयती संधी मिळाली असल्याचा आरोप जेटली यांनी केला. पाकिस्तानी सैन्याच्या वेशात भारतीय हद्दीत घुसून अतिरेक्यांनीच जवानांवर हल्ला केल्याचं वक्तव्य, अँन्टोनी यांनी आपल्या निवेदनात केलं होतं.
दरम्यान संरक्षणमंत्री एन्टोनींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानासमोर जोरदार निदर्शनं केली. ए.के. अँन्टोनी यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी भाजयुमोनं केलीय. काही आंदोलकांनी बॅरिकेट्सवरून उड्या मारून निवासस्थानाच्या परिसरात कूच करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं आंदोलकांना रोखण्यासाठी पाण्याचा वापर करण्यात आला.
पाकिस्ताननं सीमेवर गोळीबार केल्यानंतर संसदेत एकमुखाने त्याचा निषेध करण्यात आला असला, तरी राजकारण करण्याची संधी नेतेमंडळींनी काही सोडली नाही. भारतीय सैन्य सक्षम आहे मात्र सरकारने त्यांचे हात बांधले असल्याचा आरोप भाजपनं केला. तर भाजपच्या काळात सर्वाधिक दहशतवादी कारवाया झाल्याचं प्रत्युत्तर काँग्रेसनं दिलंय.
पाकिस्तानच्या हल्ल्याबाबत वेगवेगळ्या थिअरीज पुढं येत आहेत. पाकिस्तानचा हा हल्ला म्हणजे नवाज शरीफ यांचा के प्लान असल्याचं मत रिटायर्ट मेजर जनरल पी एन हून यांनी व्यक्त केलंय. पुंछमधला गोळीबार हा पाकिस्तानचा नियोजनबद्ध हल्ला असल्याचं निवृत्त ब्रिगेडीयर हेमंत महाजन यांनी म्हंटलंय. अशा परिस्थितीत पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्याशिवाय पर्याय नाही, असं त्यांचं मत आहे.
दरम्यान, तो मी नव्हेची भूमिका पाकने घेतली आहे. भारतीय हद्दीत घुसून हल्ला करणा-या पाकिस्ताननं हात झटकलेत. पाकिस्तानच्या सैन्याकडून सीमेवर कुठलाही गोळीबार झाला नसल्याचं वक्तव्य एका पाकिस्तानच्या सैन्य अधिका-यानं केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.