सुरत : कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून गाड्या, फ्लॅट आणि ज्वेलरी देणारे सुरतचे हिरे व्यापारी सावजी ढोलकिया पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सहा हजार कोटी रुपयांच्या हिरे कंपनी हरे कृष्ण एक्सपोर्टचे मालक असणाऱ्या ढोलकियांनी कर्मचाऱ्यांच्या पीएफचे 16.66 कोटी रुपये न भरल्याचा आरोप होत आहे. नवभारत टाईम्सनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजेच ईपीएफओच्या सुरत शाखेनं ढोलकियांना नोटीस दिल्याचा दावाही वृत्तपत्रानं केला आहे. शुक्रवारी ईपीएफओनं हरे कृष्ण एक्सपोर्टला शेवटची नोटीस पाठवली आहे. या कंपनीमध्ये एकूण 3,165 कर्मचारी काम करतात पण यापैकी फक्त 17 कर्मचाऱ्यांची नावच ईपीएफ स्कीममध्ये रजिस्टर आहेत. यामुळे पीएफ आणि फॅक्ट्री कायद्याचं उल्लंघन होत असल्याचं या नोटिसीत सांगण्यात आलं आहे.
कंपनीनं गेल्या काही वर्षांमध्ये कर्मचाऱ्यांचा पीएफ भरला नाही. दोन वर्षांच्या चौकशीनंतर अखेर ईपीएफओनं नोटीस पाठवून पुढच्या 15 दिवसांमध्ये 16.66 कोटी रुपये, वर्षाचं 12 टक्के व्याज दंड म्हणून आणि 25 टक्के नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आरोपांबाबत सावजी ढोलकियांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान कंपनीनं कर्मचाऱ्यांचा पीएफ, दंड आणि नुकसान भरपाई दिली नाही तर त्यांच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात येईल तसंच कंपनीचं बँक अकाऊंटही जप्त करण्यात येऊ शकतं अशी प्रतिक्रिया सुरत ईपीएफओच्या अधिकाऱ्यानं दिली आहे.
सावजी ढोलकियांनी 2014मध्ये कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून 491 गाड्या आणि 207 फ्लॅट दिले होते. तर 2016मध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांना 1260 गाड्या आणि 400 फ्लॅट दिले होते.