www.24taas.com, झी मीडिया, फारुखाबाद
पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भाजपकडून नरेंद्र मोदींचं तर काँग्रेसकडून राहुल गांधींचं नाव आघाडीवर आहे. पण, हे दोघेही या पदासाठी लायक नाहीत असं मत व्यक्त केलंय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी...
‘पंतप्रधानपद हे प्रतिष्ठेचं आणि आदराचं पद आहे. मोदी आणि राहुल हे दोघेही पंतप्रधानपदासाठी मला स्वीकारार्ह वाटत नाहीत. कारण, या दोघांकडेही या पदासाठी आवश्यक असलेली पात्रता नाही’ असं स्पष्ट विधान अण्णा हजारे यांनी केलंय. या दोघांनाही पंतप्रदानपदी स्वीकारणं अशक्यप्राय गोष्ट आहे, असं अण्णांना वाटतंय.
गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष नरेंद्र मोदी यांच्याबाबत विचारलं असता, ‘गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम करताना मोदींनी गेल्या दहा वर्षांत राज्यात लोकायुक्त नेमण्यात नेहमीच अडथळे उभे केले... भ्रष्टाचार निर्मूलनासाठी लोकायुक्ताची नियुक्ती आवश्यक नाही, असाच त्यांचा दृष्टिकोन असल्याचं त्यातून स्पष्ट झालंय. त्यामुळे ते पंतप्रधानपदासाठीही लायक नाहीत’ असं स्पष्टीकरण अण्णांनी पत्रकारांसमोर दिलंय. सोबतच राहुल गांधींकडेही ती पात्रता नाही, असंही त्यांनी म्हटलंय.
देशात पक्षीय राजकारणामुळे भ्रष्टाचार आणि गैरकारभार बोकाळला आहे. आपला जनशक्ती मोर्चा देशातील सहा कोटी समर्पित कार्यकर्त्यांना एकत्र आणून डिसेंबरमध्ये दिल्लीतील जंतरमंतरवर जनलोकपालासाठी दुसरा लढा उभारणार आहे, असं त्यांनी सांगितलंय.