भोपाळ : भाजपचे सरकार असलेल्या मध्य प्रदेशात व्यापम घोटाळा उघड झाला. मात्र, या घोटाळ्यातील संशय अधिक गडद होत आहे. व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) गैरव्यवहार प्रकरणात आता आणखी एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आलेय.
माजी केंद्रीय निरीक्षक विजय बहादूर यांचा मृतदेह ओडिशातील रेल्वे रुळावर सापडलाय. व्यापमं गैरव्यवहारात आतापर्यंत अनेक जणांचे मृत्यू झालेत. या गैरव्यवहाराची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) करत आहे.
व्यापमं प्रकरणातील दोन परीक्षांची चौकशी करत असलेले निवृत्ती आयएफएस अधिकारी विजय बहादूर यांचा शुक्रवारी सकाळी ओडिशातील झारसुगुडा येथील रेल्वे रुळावर मृतदेह आढळला. त्यामुळे या घोटाळ्याची पाळेमुळे खोदून दोषींवर कडक कारवाईची मागणी होत आहे.
बहादूर हे पुरी-जोधपूर एक्स्प्रेसमधून पुरीहून भोपाळला परतत होते. बहादूर हे १९७८ च्या आयएफएस बॅचचे अधिकारी होते. जानेवारी २०१२ मध्ये अशाच प्रकारे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या नम्रता डामोर हिचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने चौकशी सीबीआयकडे दिली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.