लोकसभेत आज जेटली मांडणार आपला तिसरा अर्थसंकल्प

अर्थमंत्री अरूण जेटली आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत.  

Updated: Feb 29, 2016, 08:16 AM IST
लोकसभेत आज जेटली मांडणार आपला तिसरा अर्थसंकल्प title=

नवी दिल्ली : अर्थमंत्री अरूण जेटली आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात सर्वाधिक भर कृषी आणि ग्रामीण विकासावर देण्यात येणार आहे. कृषी क्षेत्राला रूळावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरूनच या अर्थसंकल्पात विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचं बोललं जातंय.

अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अर्थसंकल्पात कृषी आणि शेतकरी यांच्यावरच भर असेल याचे संकेत देणारे पंतप्रधानांचं हे विधान. निसर्गाची अवकृपा, शेतीमालाला योग्य दर न मिळणं यासह विविध कारणांमुळं बळीराज सध्या संकटात सापडलाय.
 
कृषी क्षेत्रात सध्या नैराश्याचे वातावरण पसरलंय. यंदाची अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रातली हीच मरगळ दूर करण्यावर अधिक भर देण्यात येणार आहे. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या टीमनं कृषी क्षेत्राला मजबूत करण्यासाठी उपाययोजना सुचवल्यात. 

 
- शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी जेनेटेकमी मोडिफाईल तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याची गरज
- ४६ सिंचन प्रकल्पांवर भर देण्यात आहे. त्यामुळं ११ लाख हेक्टर आणि ३ वर्षात ३४ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकेल. 
- नाबार्डकडून सिंचन प्रकल्पासाठी बाँड जाहीर करण्याची घोषणा अर्थसंकल्पात अपेक्षित
- मनरेगाच्या माध्यमातून ५ लाख तलाव करण्याचे लक्ष्य, ८ हजार कोटी रूपयांची तरतूद केली जाऊ शकते
- भाडेतत्त्वावर जमीन घेऊन शेती करणा-या शेतक-यांना सुविधा अधिक देण्यात येतील

- लँड रेकार्ड डिजिटलायजेशनसाठी मोठ्या निधीची घोषणा या अर्थसंकल्पात केली जाऊ शकते
- मोबाईल अॅप, रेडिओद्वारे शेतीची माहिती आणि तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचवता येऊ शकते
- फर्टिलायजर सब्सिडीसाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रोजेक्ट हाती घेतला जाईल

 
देशभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्या चिंतेचा विषय आहे. शेतक-यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी कृषी क्षेत्राकडे जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचं भाजप सरकारला कळून चुकलंय. त्यामुळं २०१६-२०१७चा अर्थसंकल्प कृषी क्षेत्र, शेतकरी आणि ग्रामीण विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.