www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षेखालील ‘राष्ट्रीय सल्लागार समिती’तून (एनएसी) सामाजिक कार्यकर्त्या अरुणा रॉय यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी समितीतील आपल्या पदावरून राजीनामा दिलाय.
केंद्र सरकारच्या कार्यप्रणालीवर नाराज झालेल्या अरुणा रॉय यांनी आपली चीड व्यक्त केलीय. मनरेगातील कामगारांना किमान वेतन देण्याच्या एनएसीच्या शिफारसींनाही कचऱ्याची टोपली दाखविण्यात आली... कर्नाटक हायकोर्टाच्या किमान वेतनाच्या निर्णयालाही हरताळ फासण्यात आला... याबद्दल त्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून आपला असंतोष व्यक्त केलाय.
यावेळीच त्यांनी एक खळबळजनक विधानदेखील केलंय. रॉय यांच्या मते, पंतप्रधान मनमोहन सिंग हे सोनिया गांधी यांचं म्हणणं देखील ऐकत नाहीत. मनरेगाच्या किमान वेतनासंबंधी त्या बोलत होत्या. रॉय यांच्या म्हणण्यानुसार ‘सोनिया गांधी यांनी मनरेगाचं किमान वेतन ठरवण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना एक पत्र लिहिलं होतं... पण यावर पंतप्रधानांनी काहीही उत्तर दिलेलं नाही’
राजकीय वर्तुळात सध्या मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्यातील मतभेदांच्या चर्चांना उधाण आलंय. रॉय यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना एकप्रकारे पुष्टीच मिळालीय.
याबद्दल त्यांनी गुरुवारी स्पष्टीकरण देताना, `संपूर्ण राष्ट्र ज्या गोष्टींचा सामना करतंय अशा गोष्टींपासून केंद्र सरकार आणि संसद मात्र दूरच राहत असल्याचं त्यांनी म्हटलंय. खाद्यसुरक्षा, पेन्शन सारख्या महत्त्वाच्या गोष्टींनाही सद्य व्यवस्थेत महत्त्व मिळत नाही. यासाठी मी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर नाही तर सध्याच्या व्यवस्थेवर आणि संसदेवर नाराज आहे. कायदे बनविण्यातही ही व्यवस्था अयशस्वी ठरलीय` असं म्हणत आपला रोष व्यक्त केलाय. ३१ मे रोजी राष्ट्रीय सल्लागार समितीमधला अरुणा रॉय यांचा कार्यकाल पूर्ण होतोय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.