‘आप’ मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कामकाजाला सुरुवात!

नवनिवार्चित दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शपथ घेताच आपल्या कामकाजाला सुरुवात केली. त्यांच्या टीममधील मंत्रीमंडळाची ही तोंडओळख...

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 28, 2013, 05:16 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नवनिवार्चित दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शपथ घेताच आपल्या कामकाजाला सुरुवात केली. त्यांच्या टीममधील मंत्रीमंडळाची ही तोंडओळख...
आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांनी रामलीला मैदानावर शपथ घेतल्यानंतर लगेचच खातेवाटपही जाहीर करण्यात आलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी गृहखातं, वाणिज्य खातं, ऊर्जा खातं, वीज आणि पाणीपुरवठा खातं आपल्याकडेच ठेवलंय.
केजरीवालांचे खास सोबती मनीष सिसोदिया यांच्याकडे शिक्षण, उच्च-शिक्षण, महसूल खातं, पीडब्लूडी, नगरविकास, स्थानिक संस्था, जमीन आणि इमारत विभाग ही खाती आहेत.
सौरभ भारद्वाज यांच्याकडे अन्नपुरवठा आणि परिवहन या विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर सत्येंद्र जैन यांच्याकडे आरोग्य आणि उद्योग मंत्रालय सोपवण्यात आलंय.
अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील एकमेव महिला मंत्री राखी बिर्ला यांच्याकडे महिला आणि बालकल्याण खात्याची धुरा सोपवण्यात आलीय तर गिरीश सोनी यांच्याकडे समाजकल्याण खातं सोपवण्यात आलं आहे.
सोमनाथ भारती यांच्याकडे विधी, पर्यटन, प्रशासकीय सुधारणा तसंच कला आणि संस्कृती मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलीय.
रामलीला मैदानावर लक्षावधी दिल्लीकरांच्या साक्षीनं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अरविंद केजरीवाल आपल्या सहकारी मंत्र्यांसोबत राजघाटावर महात्मा गांधींना अभिवादन करण्यासाठी पोहोचले. आज शनिवारची सुट्टी असूनही अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कामकाजाला सुरूवात केलीय. अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे सातवे मुख्यमंत्री आणि आजपर्यंतचे सर्वात तरूण मुख्यमंत्री आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.