बंगळुरू : एका टेनिस क्लबमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी आलेल्या महिलेवर बुधवारी रात्री सामूहिक बलात्कार झाल्याची घटना बंगळुरूत घडली. या प्रकरणी कर्नाटक स्टेट लॉन टेनिस असोसिएशनच्या दोन सुरक्षा रक्षकांना अटक करण्यात आली आहे.
पीडित महिला ही टुमकूर जिल्ह्याची रहिवाशी असून टेनिसचे प्रशिक्षण घेण्यासाठी ती कर्नाटक स्टेट लॉन टेनिस असोसिएशनच्या क्लबमध्ये आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ती तिथे पोहोचली तेव्हा क्लब बंद होता. त्यामुळं तिला दुसऱ्या दिवशी येण्यास सांगण्यात आले. त्याचवेळी येथील कबन पार्कमध्ये ड्युटीवर असलेल्या दोन सुरक्षा रक्षकांनी तिला पाहिले आणि तिच्याकडं विचारपूस केली. तिनं येण्याचा हेतू सांगितल्यानंतर या दोघांनी क्लबमध्ये प्रवेश घेऊन देण्यासाठी आम्ही तुला मदत करू, असं तिला सांगितलं.
स्टेडिअमवरून नराधमांनी तिला सिद्दलिंगय्या सर्कलवर नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. रात्रीच्या गस्तीवर असलेल्या दोन पोलीस हवालदारांनी रस्त्याच्या बाजूला विव्हळताना तिला पाहिले आणि हे प्रकरण उजेडात आले. त्यानंतर पीडित महिलेने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी दोघा नराधमांना अटक केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.