www.24taas.com,नवी दिल्ली
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचार समितीची धुरा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींकडे देण्यात येणार आहे. इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्रानं हा दावा केलाय.
नरेंद्र मोदींच्या गुजरातमधील सुशासन आणि आर्थिक विकासाचा मुद्यावर लोकसभा निवडणुकीचा प्रचार केला जाणार आहे. त्यासाठी प्रचार समितीचे प्रमुखपद मोदींकडे देण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंही मोदींच्य़ा नावाला हिरवा कंदील दिल्य़ाचं सांगण्यात येतंय.
नरेंद्र मोदींना भाजपमधून विरोध होत असल्याने त्यांच्याकडे जबाबदारी देऊ नये असा एक मतप्रवाह होता. तर एनडीएतील काही घटक पक्षातील प्रमुख राजकीय पक्ष नेत्यांनी विरोध केला होता. यापैकी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या राज्यात प्रचारासाठी मोदींना येऊ दिले नव्हते. त्यामुळे नितीशकुमार यांना स्पष्ट विरोध असल्याचे दिसत होते.
मोदी यांनी गुजरातमध्ये सलग तिसऱ्यांना स्वत:च्या नेतृत्वावर आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका एकहाती जिंकल्या. त्यामुळे पक्षातील मोदींचे स्थान अधिकच बळकट झाले. तर काहींनी मोदींना पंतप्रधान बनविण्यास काहीही हरकत नसल्याचे म्हटले. तर पंतप्रधान शर्यतीत आणखी काही नावे होती. त्यामुळे मोदींकडे नेतृत्व सोपविण्यास विरोध होत होता. आता तर संघाने मोदींना हिरवा कंदील दाखविल्याने हे नेतृत्व दिल्याचे बोलले जात आहे.