आज भाजप कार्यकारिणीची बैठक... बंद दाराआड!

दिल्लीत आज भाजप कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक होतेय. या बैठकीत आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 1, 2013, 11:20 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
दिल्लीत आज भाजप कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक होतेय. या बैठकीत आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
राजनाथ सिंह यांनी भाजपाध्यक्षाची सूत्र हाती घेतल्यानंतर पक्षाची ही पहिलीच बैठक आहे. या बैठकीत हैदराबादमध्ये झालेले बॉम्बस्फोट, ऑगस्टा वेस्टलँन्ड हेलिकॉप्टर घोटाळा आणि रेल्वे आणि केंद्रीय अर्थसंकल्पावर सरकारची कोंडी करण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच अनेक भाजप नेत्यांचे फोन टॅप झाल्याचंही आज उघड झालंय. या घटनेचे पडसादही आजच्या बैठकीत उमटण्याची शक्यता आहे.

आगामी निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना प्रबळ पर्याय म्हणून स्वत:ला उभं करण्याचं आव्हान विरोधकांसमोर आहे. याचाच रोडमॅप आखण्याची तयारी पक्षात सुरू झालीय. आजची बैठक बंद दाराआड होणार आहे तर भाजपची दोन दिवसांची राष्ट्रीय परिषद शनिवारी आणि रविवारी होणार आहे. ज्यामध्ये देशभरातील कार्यकर्ते सहभागी होतील.