भाजप अध्यक्ष अमित शाहांपुढे अनेक आव्हाने?

 भाजपचे दहावे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अमित शाह यांची काल निवड करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला उत्तर प्रदेशात घवघवीत यश मिळवून दिलं. आता महाराष्ट्र, हरयाणा आणि झारखंडसारख्या राज्यात सत्ता मिळवून देण्याचं आव्हान अमित शाहांपुढं असणार आहे.

Updated: Jul 10, 2014, 10:10 AM IST
भाजप अध्यक्ष अमित शाहांपुढे अनेक आव्हाने? title=

नवी दिल्ली : भाजपचे दहावे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अमित शाह यांची काल निवड करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला उत्तर प्रदेशात घवघवीत यश मिळवून दिलं. आता महाराष्ट्र, हरयाणा आणि झारखंडसारख्या राज्यात सत्ता मिळवून देण्याचं आव्हान अमित शाहांपुढं असणार आहे.

 भाजपच्या सिंहासनावर नवा 'शहंशाह' विराजमान झालाय. अमित शाह... पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वासू सहकारी. निवडणूक स्ट्रॅटिजिस्ट. भाजपचा चाणक्य... आणि अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्त्व, अशी त्यांची ओळख आहे.
 लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात 80 पैकी 71 जागा जिंकून अमित शाह यांनी आपलं पाणी दाखवून दिलं... त्याची बक्षिसी आता मिळालीय.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा 50 वर्षीय अमित शाहांच्या खांद्यावर सोपवण्यात आलीय. पक्षाचे ते आजवरचे सर्वात तरूण राष्ट्रीय अध्यक्ष बनलेत. मावळते पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी अमित शाह यांच्या निवडीची घोषणा केली.

गुजरातमधील ज्येष्ठ नेते ते थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष हा प्रवास अमित शाहांनी वर्षभरात पार केला. उत्तर प्रदेशसह बिहारमध्येही त्यांच्या नेतृत्वाची चुणूक दिसली. बिहारमध्ये भाजप आणि मित्रपक्षांना 40 पैकी 31 जागा मिळाल्या. लोक जनशक्ति पक्षाचे नेते रामविलास पासवान आणि ओबीसी नेते उपेंद्र कुशवाह यांना एनडीएत सामील करून घेण्यात शाहांचं मोठं योगदान होतं. 

भाजपची सत्ता आल्यानंतर अनेक बडे नेते मंत्री झाले. त्यामुळं पक्षाला कुशल नेतृत्वाची गरज होती. अमित शाहांच्या रूपानं ती पोकळी आता भरून काढण्यात आलीय. अमित शाहांनी उत्तर प्रदेशात ज्या पद्धतीनं भाजपामध्ये जान आणली, त्यामुळं आता त्यांच्याकडून अपेक्षाही उंचावल्यात. 

महाराष्ट्र, झारखंड, जम्मू काश्मीर, हरयाणा आणि दिल्लीसारख्या राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याठिकाणी भाजपला सत्तेवर आणणं, पश्चिम बंगालसारख्या राज्यात संघटना मजबूत करणं, महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडेंनंतर महायुतीची मोट एकत्र बांधून ठेवणं, शिवसेनेसारख्या घटकपक्षाशी सलोख्याचे संबंध ठेवणं, मोदी सरकार आणि पक्षसंघटना यांच्यात समन्वय साधणं, अशी आव्हानं त्यांच्यापुढं असणार आहेत.

अमित शाह राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानं आता भाजपमध्ये पंतप्रधान मोदींचीच एकहाती सत्ता असल्याचं स्पष्ट झालंय. पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष अशी दोन दोन सत्ताकेंद्र निर्माण होणार नाहीत, याची काळजी मोदींनी घेतलीय.. आता पक्षाध्यक्ष या नात्यानं भाजपमध्ये तरूण नेत्यांची नवी फौज निर्माण करण्याची जबाबदारी अमित शाहांवर असणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.