www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीत आज काँग्रेसच्या हाताचा आधार घेत आम आदमी पार्टीचं सरकार स्थापन झालं. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने दिल्लीकरांना दाखवलेलं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आज सरकार स्थापना केली.
दिल्लीचे सातवे मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्या सहा आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.
केजरीवाल यांनी स्वतःच म्हटल्य़ाप्रमाणे हा खरोखऱ एक ऐतिहासिक दिन होता.
मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा रामलीला मैदानावर झाला. या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीकरांनी एकच गर्दी केली होती. खुद्द केजरीवाल आणि त्यांचे सहकारी मेट्रो रेल्वेतून प्रवास करून गर्दीतून सर्वसामान्यांसारखे वाट काढूनच आले. शपथविधी झाल्यावर या सोहळ्याचं भव्य अशा रॅलीत रुपांतर झालं. केजरीवाल यांनी आज पहिल्याच दिवशी लाचखोरांविरोधात एल्गार पुकारला.
अण्णांनी राजकारणाला चिखलाची उपमा दिली होती याची आठवण केजरीवाल यांनी करून दिली. मात्र या चिखलाची सफाई करण्यासाठी आपण यात उतरलो असल्याचं ते म्हणाले. केजरीवाल यांना काँग्रेस भाजपनं शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच त्यांनी दिल्लीकरांना दिलेली आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करावीत अशी इच्छाही व्यक्त केलीय.
दरम्यान, अण्णा हजारे यांनीही अरविंद केजरीवाल यांना शुभेच्छा दिल्यात. शिवाय अरविंद चांगलं काम करुन दाखवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अरविंद केजरीवाल ज्याप्रमाणे सामान्य व्यक्तीसारखं काम करतायेत, तसंच इतर राजकीय नेत्यांनी करावं असंही अण्णा म्हणाले.
केजरीवाल यांनी लगेचच राजघाटावर जात गांधीजींच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी विधानभवनात जात मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्विकारला. केजरीवाल यांनी दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याची वेळ आली आहे. ती आश्वासनं खऱच पूर्ण होतात की हा निव्वळ एक उत्साह ठरतो हे येत्या काळात स्पष्ट होईलच.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.