www.24taas.com, अहमदाबाद
गुजरात विधानसभा निवडणुकीचा भाजपनं जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. त्यात विविध आश्वासनं देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय. तर काँग्रेसनं मोदींविरोधात आरोपपत्र प्रसिद्ध करत त्यांना आरोपीच्या पिंज-यात उभं करण्याचा प्रयत्न केलाय.
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. त्यामध्ये विविध आश्वासनं देण्यात आलीत. त्यात राज्यातल्या 30 लाख युवकांना नोक-या देण्याचं आश्वासन देण्यात आलं असून, कर्ज फेडण्यासाठी शेतक-यांना मदत, शहरी भागात 22 लाख, ग्रामीण भागात 28 लाख पक्की घरे बांधणार, जेनरीक औषधे मोफत देणार,राज्यातील सर्व नागरिकांचा आरोग्य विमा काढणार, पुढील पाच वर्षांत विजेचं उत्पादन दुप्पट करणार तसंच गुजरातमध्ये राईट टू सर्व्हिस ऐक्ट आणण्याचं आश्वासनंही जाहीरनाम्यात देण्यात आलंय.विविध योजना जाहीर करुन भाजपनं मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय.
मोदींचे विकासाचे दावे खोडून काढत काँग्रेसनं मोदींविरोधात आरोपपत्र प्रसिद्ध केलंय. मोदींच्या कार्यकाळात राज्यातली 14 हजार मुले गायब झाल्याचा आरोप करण्यात आलाय. मोदी सरकारी यंत्रणेचा राजकारणासाठी उपयोग करत असल्याचंही आरोपपत्रात म्हटलंय. तसंच मोदींच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात मंदिरांची लूट झाली असून सर्वाधिक महंतांची हत्याही मोदींच्या काळात झाल्याचा आरोप करण्यात आलाय.
गुजराती जनता मोदींच्या जाहीरनाम्यावर विश्वास ठेवते की काँग्रेसनं मोदींवर केलेले आरोप खरे मानते हे येत्या 20 तारखेलाच स्पष्ट होईल.