नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आज मतदान झाले. पाच वाजेपर्यंत ६७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, एक्झीटपोलने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पसंती दिल्याचे दिसत आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा आपची सत्ता येण्याचे संकेत आहे. मात्र, १० फेब्रुवारीला दुपारी १२ पर्यंत स्पष्ट चित्र स्पष्ट होईल.
दिल्लीकरांनी मतदानाचा चांगला प्रतिसाद देत उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक यंत्रात बंद केले. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुमारे ६७ टक्के मतदान झाले होते. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत दिल्लीतील ६५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला होता. मतदानाची अंतिम आकडेवारी येईपर्यंत मतदानाचा टक्का आणखी वाढूही शकतो असे निवडणूक अधिका-यांनी सांगितले.
उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल, भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी, केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन, दिल्लीचे राज्यपाल नजीब जंग, कॉंग्रेसनेते अजय माकन, आणि भाजप नेते वरुण गांधी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
प्रचारादरम्यानच्या एकूण परिस्थितीनुसार आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्षात थेट स्पर्धा दिसून आली आहे. राजधानी दिल्ली एकाच वर्षात दुसऱ्यांदा मतदानाला सामोरे जात आहे. डिसेंबर २०१३मध्ये झालेल्या निवडणुकीत आपला ३१ जागा, भाजपला २८ जागा तर कॉंग्रेसला ८ जागा मिळाल्या होत्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.