'पाकला धडाशिकवण्यासाठी मोदींकडे युद्धाचा पर्याय'

 भारतात जर दहशतवादी हल्ला झाला, आणि त्यात पाकिस्तानचा हात असला, तर  पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानवर हल्ला करू शकतात. एवढंच नाही तर नरेंद्र मोदी पाकिस्तानवर लष्करी कारवाई करण्यासही मागे-पुढे पाहणार नाहीत, असा इशारा रॉबर्ट ब्लॅकविल यांनी पाकिस्तानला दिला आहे. 

Updated: Feb 7, 2015, 06:29 PM IST
'पाकला धडाशिकवण्यासाठी मोदींकडे युद्धाचा पर्याय' title=

वॉशिंग्टन :  भारतात जर दहशतवादी हल्ला झाला, आणि त्यात पाकिस्तानचा हात असला, तर  पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानवर हल्ला करू शकतात. एवढंच नाही तर नरेंद्र मोदी पाकिस्तानवर लष्करी कारवाई करण्यासही मागे-पुढे पाहणार नाहीत, असा इशारा रॉबर्ट ब्लॅकविल यांनी पाकिस्तानला दिला आहे. 

 ब्लॉकविल हे अमेरिकेतील ‘काऊंसिल ऑफ फॉरेन रिलेशन्स’या संस्थेद्वारा आयोजित एका संमेलनात बोलत होते. ब्लॅकविल हे अमेरिकेचे भारतातील माजी राजदूत आहेत.
 
मोदी हल्ल्याने प्रत्युत्तर देऊ शकतात
भारतीय संसदेवरील हल्ल्यानंतर जेव्हा कधी भारतावर दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा तत्कालीन पंतप्रधानांनी लष्करी प्रतिहल्ल्याचा विचार केला, मात्र त्यानंतर लष्करी हल्ला न करण्याचा निर्णय घेतला. मात्र आजच्या घडीला भारतीयांच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकने हल्ला केल्यास प्रतिहल्ला करण्यास मागे-पुढे पाहणार नाहीत, असे रॉबर्ट ब्लॅकविल यांचे मत आहे.

स्टीफन कोहेन सहमत
ब्रुकिंग्ज इन्स्टिट्यूटचे ज्येष्ठ अभ्यासक स्टीफन कोहेन यांनीही ब्लॅकविल यांच्या मताला पूर्ण सहमती दर्शवली आहे. 'भारतावर मुंबई हल्ल्यासारखा हल्ला पुन्हा होण्याची शक्यता कमी आहे. मात्र तसा हल्ला झालाच तर मोदी पूर्ण ताकदीनिशी प्रत्युत्तर देतील. कारण त्यांचे व्यक्तिमत्व आक्रमक आहे', असे कोहेन यांनी म्हटले आहे.

लष्करी हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही 
ब्लॅकविल पुढे म्हणतात की, भारतातील गेल्या पंधरा-वीस वर्षांतील पंतप्रधानांच्या तुलनेने आजचे पंतप्रधान म्हणजेच नरेंद्र मोदी हे पाकिस्तानवर लष्करी हल्ला करण्याचा विचार करु शकतात व ते त्यासाठी सक्षम आहेत. मोदींचे व्यक्तिमत्व, त्यांना असलेला जनतेचा पाठिंबा या साऱ्याचा विचार करता मोदी लष्करी हल्ल्यावर सकारात्मक विचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.