www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
अपघात झाल्यानंतर अर्थातच सगळेच गडबडून जातात. पण, प्रसंगावधान राखून तातडीनं उपचार मिळाला तर प्रसंगी प्राण आणि गमावलेले अवयवही परत मिळवू शकतात, हे दिल्लीतील एका घटनेनं सिद्ध केलंय. अपघात झाल्यामुळे धडापासून वेगळा होऊन ५० मीटर लांब पडलेला हात त्यानं स्वत:च उचलला आणि तातडीनं हॉस्पीटल गाठलं. त्यामुळे त्याचे प्राण तर वाचलेच परंतु त्याचा हातही पुन्हा शस्त्रक्रिया करून शरीराला जोडण्यात डॉक्टरांना यश आलंय.
नवी दिल्लीच्या यमुना एक्प्रेस हायवे डॉक्टर महेंद्र नारायण सिंग (३२ वर्ष) हे आपल्या वडिलांसोहत उत्तरप्रदेशातून दिल्लीला जात होते. पाणी पिण्यासाठी त्याने गाडी एका ढाब्याजवळ थांबवली आणि अचानक मागून येणाऱ्या गाडीनं उभ्या असणाऱ्या गाडीला जोरदार धडक दिली. डॉक्टर महेंद्रचा हात शरीरापासून वेगळं करण्यासाठी ही धडक पुरेसी होती. रस्त्यावर आणि डॉक्टरांच्या शरीरभर रक्त पसरलं होतं. हात तुटून ५० मीटर अंतरावर जाऊन पडला होता. भळाभळा रक्त वाहत होतं.
गुरगावमधील पुष्पांजली हॉस्पिटलमध्ये किडनीतज्ज्ञ म्हणून प्रॅक्टीस करणाऱ्या डॉ. महेंद्र यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून वेदनेनं कळवळत असतानाही प्रसंगावधान राखलं. वडिलांना तो रस्त्यावर निखळून पडलेला हात उचलण्यास सांगितलं. हात तुटलेल्या ठिकाणी शरीरावर कपडा बांधण्याची सूचना केली आणि हात पुन्हा शरीराला जोडायचा असेल तर तो योग्यरितीने जपायला हवा, म्हणून ढाब्यावरून एका बर्फाची पिशवी घेऊन त्यात तो हात ठेऊन हॉस्पीटल गाठलं. कैलाश हॉस्पीटलमधले डॉक्टरही महेंद्रच्या या प्रसंगावधानानं अचंभित झाले.
एखाद्या पुस्तकातली कथा वाटावी अशी ही घटना घडली ती दिल्लीतील डॉक्टर यांच्याबरोबर. डॉक्टर असणा-या महेंद्र यांनी प्रसंगावधानाने स्वत:चा हात वाचवला. महेंद्रच्या या प्रसंगावधानाने त्याच्यावर ऑपरेशन करणारे डॉक्टरही आश्चर्यचकीत झाले. डॉक्टरांनी महेंद्रवर ऑपरेशन करुन त्याचा हात पुन्हा त्याच्या शरीराला जोडला. चार तास चाललेल्या ऑपरेशनमध्ये महेंद्रच्या हातामधील धमन्या आणि शिरांचे जटील ऑपरेशन करण्यात आले. पुढील धोका टाळण्यासाठी लवकरात लवकर ऑपरेशन करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
अपघातामध्ये अवयव तुटल्यास काय कराल?
> तुटलेल्या अवयवाला लगेचच बर्फच्या पिशवीत किंवा थंड जागी ठेवा.
> ज्या ठिकाणी अवयव तुटला आहे त्या ठिकाणी कापडाने बांधुन ठेवा.
> थेट मोठे हॉस्पिटल शोधण्याऐवजी जवळच्या हॉस्पिटलमध्ये जावून तुटलेला भाग आणि अवयव निर्जंतुकीकरण करुन घ्या.
> बोटे, पंजा यासारखे अवयव तुटल्यास ते व्यवस्थीत जपून ठेवल्यास आठ ते बारा तासामध्ये त्याचे ऑपरेशन केल्यास ते पुन्हा जोडता येऊ शकतात.
> संपूर्ण हात किंवा पाय तुटल्यास त्याला जोडण्यासाठी सहा तासात ऑपरेशन करणे गरजेचे असते
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.