अनंतपूर : आपल्या पत्नीचं गाणं पसंत नसलेल्या एका पतीनं स्वत:ला भर कार्यक्रमात पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना आंध्रप्रदेशात घडलीय.
अनंतपूरमध्ये ही घटना घडलीय. मंगळवारी इथं उगाडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातच 40 वर्षीय शेख बशीर नावाच्या व्यक्तीनं जवळपास 50 जणांच्या समोर स्वत:ला आगीच्या हवाली केलं. या घटनेत बशीर 70 टक्क्याहून अधिक भाजलाय. त्याला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं... त्याची प्रकृती अद्यापही गंभीर आहे.
पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दाखल केलीय. मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात बशीरची 35 वर्षीय पत्नी सादिका संजारी गाणं गाणार होती... मात्र, बशीरला हे पसंत नव्हतं. त्यानं सादिकाला गाणं गाण्यास मज्जाव केला. परंतु, सादिका आपल्या मतावर ठाम राहिली... आणि मंचावर गाणं गाण्यासाठी दाखल झाली... तिचं गाणं सुरू होताच बशीरनं स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतलं.
पत्नीला धमकावण्यासाठी आपण आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं बशीरनं पोलिसांना सांगितलंय. बशीर - सादिकाच्या लग्नाला 18 वर्ष झालेत त्यांना तीन मुलंही आहेत. बशीरच्या दारु पिण्याच्या सवयीमुळे घराची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे... घर चालवण्यासाठी सादिका कार्यक्रमांत कव्वाली आणि भक्तीगीतं गाते.... परंतु, त्यावरही बशीरचा आक्षेप होता.