www.24taas.com, मुंबई
नोकरदार वर्गासाठी एक खूशखबर आहे… आता शासकीय सेवेतल्या आणि खाजगी सेवेतल्या नोकरदारांना पीएफचा हिशोब ठेवायची गरजच उरणार नाहीए. कारण आपल्या पीएफ खात्यात आतापर्यंत किती पैसे जमा झालेत याची माहिती त्यांना ऑनलाईन मिळू शकणार आहे...
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) सुरू केलेल्या ‘ई-पासबुक’सेवेमुळे ही सुविधा सहज उपलब्ध होणार आहे. http://members.epfoservices.in/ या पोर्टलवर जाऊन सदस्यानं नोंदणी केल्यानंतर त्याला ही सेवा उपलब्ध होईल. यासाठी पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या कुठल्याही एका फोटो आयडीवरील (आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, रेशनिंग कार्ड इ.) नंबर रजिस्टर करावा लागणार आहे आणि तुमचा मोबाईल नंबर हा त्याचा पासवर्ड असेल.
ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, सदस्यांना आपला खाते क्रमांक, एस्टॅब्लिशमेंट कोड या क्रमांकांच्या आधारे ई-पासबुक मिळू शकणार आहे. कर्मचा-याचा हिस्सा किती, कंपनीकडून मिळालेला वाटा किती आणि पेन्शन फंडात जमा केलेली रक्कम किती, याबाबतचा संपूर्ण तपशील ई-पासबुकमध्ये असेल. अर्थात, ज्या सदस्यांचं पीएफ अकाउंट निष्क्रिय झालं असेल त्यांना ही सुविधा मिळू शकणार नाही.